Ravi Shastri । बुमराह आणि जडेजा नसले तरीही इंडियाच टी-२० वर्ल्डकप जिंकणार – रवी शास्त्री

Ravi Shastri – भारताचा टी-२० विश्वचषक संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली आहे. मात्र भारतीय संघ १५ ऐवजी १४ खेळाडूंसोबत रवाना झाला आहे. कारण जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी संघात कोण खेळणार? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. स्पर्धा सुरु होण्याअगोदर पुढील काही दिवसांत १५ व्या खेळाडूचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो खेळाडू स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-२० विश्वचषकबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा भारतीय संघाचे मुख्य खेळाडू आहेत. सध्या ते दोघेही दुखापतीने संघाबाहेर बसले आहे. १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी हे दोन्ही खेळाडू खेळणार नाहीत. त्यामुळे भारतीय संघाला या स्पर्धेत आता कमजोर मानले जात आहे. मात्र बुमराह आणि जडेजा खेळणार नसले तरी भारतच विश्वचषकचा प्रबळ दावेदार आहे, असे रवी शास्त्री ( Ravi Shastri ) यांनी म्हटले आहे.
शास्त्री ( Ravi Shastri ) म्हणाले की,”बुमराहाचे टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणे ही मुळीच चांगली बातमी नाही, मात्र त्याच्या जागी आता दुसऱ्या एखाद्या गोलंदाजाला चांगली कामगिरी करण्याची संधी असणार आहे. खेळाडूंना दुखापत होणे स्वाभाविक आहे, त्यामुळे त्याबाबत आपण काहीही करू शकत नाही. बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुध्द पुनरागमन केले होते मात्र, २ सामने खेळल्यानंतर त्याच्या दुखापतीने पुन्हा तोंड वर काढले.”
शास्त्री ( Ravi Shastri ) पुढे म्हणाले की, “बुमराह आणि जडेजाशिवायही भारतीय संघ विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकतो. भारतीय संघ सध्याही मजबूत आहे. त्यामुळे संघ जर सेमीफायनल पर्यंत मजल मारू शकला तर स्पर्धेचे विजेतेपद जास्त दूर राहणार नाही. त्याचबरोबर भारताला स्पर्धेची सुरुवात चांगल्याप्रकारे करणे अत्यंत गरजेचे आहे. जडेजा आणि बुमराह नाहीत मात्र त्याच्या गैरहजेरीत इतर खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे.”





