नारायणपूरच्या रत्नाकर बोरकर यांची बैलजोडी तिसऱ्यांदा ओढणार संत गोरोबा काकांचा पालखी रथ

नारायणपूर : संत गोरोबा काका पायी पालखी सोहळ्यासाठी पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील शेतकरी रत्नाकर उर्फ नाना बोरकर यांची ‘पोपट-रतन’ ही सुप्रसिद्ध बैलजोडी यंदा तिसऱ्या वर्षी रथ ओढण्यासाठी सज्ज झाली आहे. हा सोहळा 20 जून 2025 रोजी भोर तालुक्यातील गुंजवणे येथील संत गोरोबा काका समाधीस्थळापासून सुरू होऊन पंढरपूर येथे समारोप होईल.
17 दिवसांचा हा पालखी सोहळा भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती आणि सोलापूर जिल्ह्यांतून मार्गक्रमण करतो. गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या या सोहळ्याला वारकरी संप्रदायात विशेष मान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावातून याची सुरुवात होते. रत्नाकर बोरकर यांची बैलजोडी गेल्या दोन वर्षांपासून सोहळ्याचा अविभाज्य भाग ठरली आहे.
या सोहळ्यात शेतकरी वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यापूर्वी भातलावणीची कामे आटोपून वारकरी विठ्ठलनामाच्या भक्तीमय गजरात सहभागी होतात. मार्गात स्थानिक ग्रामस्थ, संस्था आणि मंडळे वारकऱ्यांचे स्वागत करतात. भोजन, फराळ, पाणी आणि निवासाची व्यवस्था केली जाते. स्थानिक प्रशासनही सहकार्य करते. दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असून, गावागावांत उत्सवाचे वातावरण असते.





