Pune District : श्री दत्तनामाच्या जयघोषांनी श्री क्षेत्र नारायणपूर दुमदुमले

गराडे : जय जय गुरुदेव दत्ता। अत्रेय अनुसये सुता। अत्रेय अनुसये सुता जय जय गुरुदेव दत्ता” आशा गजरात बुधवार (दि. 3) सायंकाळी 7.03 मिनिटांनी पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तजन्म सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला. यानंतर जन्मसोहळा होऊन नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात तल्लीन झाला होता.
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे (दि.२) पासून दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात झाली आहे. परमपूज्य श्री सद्गुरू नारायणमहाराज यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य श्री पोपटमहाराज टेबे स्वामी यांच्या आधिपत्याखाली व व्यवस्थापक भरत क्षीरसागर यांच्या व्यवस्थेत हा दत्त जयंतीसोहळा सकाळी उत्सव मूर्तींना अभिषेक घालून आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर दुपारी जिल्ह्यातून चालत आलेल्या ४५ दिंड्या मंदिरात घेऊन त्यांचे स्वागत करून त्या दिंड्यातील मानाच्या दिंड्यांचा सत्कार करण्यात आला.
मंदिरात दत्त मूर्तीस फुलांची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी पोपट महाराज यांचे दत्त जन्म सोहळ्याबाबत प्रवचन होऊन सात वाजून तीन मिनिटांनी जन्म सोहळा पार पडला. त्यानंतर फुले उधळण्यात आली. पाळणा होऊन सुंठवडा वाटण्यात आला. शासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शासनातर्फे उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, पोलीस निरीक्षक कुमार कदम आदी अधिकारी उपस्थित होते. आमदार विजय शिवतारे, उल्हास पवार, दादा वेदक, विक्रम जैन, रानधीश मध्यप्रदेश, महादेव जाधव, कलकत्ता, प्रकाश बाफना, एम. के. गायकवाड, बबनराव टकले. डॉ. उमेश डोंगरे, तात्यासाहेब भिंताडे, ऍड. तानाजी घारे, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर आदी उपस्थित होते.





