पुणे | रत्नागिरीचा हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – यंदा पडलेल्या अति उष्णतेचा परिणाम कोकणातील हापूस आंब्यांवर झाला. उष्णतेमुळे परिपक्व झाल्याने आंब्याचा हंगाम लवकर सुरू झाला होता. तो आता लवकर संपणार आहे. नेहमीच्या तुलनेत १५ ते २० दिवस अगोदरच हंगाम संपणार आहे. कोकणातील हापूसची आवक घटत चालली आहे.
मार्केट यार्डातील फळ विभागात गेल्या आठवड्यात दीड ते दोन हजार पेटी होणारी आवक आता एक हजार ते बाराशे पेटीच होत आहे. ती अजून घटत जाणार आहेत. आवक घटली असली, तरीही भाव मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तयार आंब्यांच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीला १५०० ते २५०० रुपये इतका भाव मिळत आहे.
येथील फळ बाजारात सुरुवातील कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतून आवक होत होती. आता रत्नागिरी जिल्ह्यातून होत आहे. तुरळक आवक सिंधुदुर्गमधून होत आहे. यंदा उष्णता जास्त होती. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत लवकर आंब्यांची आवक सुरू झाली. त्यामुळे आता हंगाम लवकर संपणार आहे. दरवर्षी १५ जूनपर्यंत रत्नागिरी हापूसची तुरळक आवक सुरू असते. ती पुढील काही दिवसच असणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पूर्वमोसमी पावसाने पल्पसाठी आंब्यांची विक्री
पूर्वमोसमी पावसामुळे आंब्याची मागणी घटली आहे. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. माल पाठविण्यासाठी वाहतूक खर्च येतो. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी पुणे, मुंबईसह इतर भागात आंबे पाठविणे कमी केले आहे, तर पल्पसाठी आंब्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकरी फळप्रक्रिया उद्योगांना माल विकण्यास प्राधान्य देत आहेत.
यंदा अतिउष्ण वातावरण आहे. त्यामुळे कोकणातील हापूसचा हंगाम लवकर सुरू झाला. आता हा हंगाम १५ ते २० दिवस लवकर संपणार आहे. पुढील आठ ते दहा दिवसच आंब्याची आवक सुरू राहील, अशी स्थिती आहे. – अरविंद मोरे, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.
कर्नाटक हापूस १० जूनपर्यंत
कोकणातील आवक घटली असली, तरीही कर्नाटक येथून हापूस बाजारात दाखल होत आहे. रविवारी (दि. १९) ७ ते ८ हजार पेटी आवक झाली. ४ ते ५ डझनाच्या पेटीला ८०० ते १३०० रुपये भाव मिळत आहे. सध्या कोकणातील हापूसपेक्षा कर्नाटक हापूस खरेदी करण्यास नागरिक पसंत देत आहेत. १० जूनपर्यंत कर्नाटक हापूसची आवक सुरू राहणार असल्याची माहिती कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.





