“नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओसाठी रश्मी, उद्धव ठाकरेंकडून धमक्या” ; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. सध्या नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. यादरम्यान आता नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.
नितीन देसाई यांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग म्हणजे एडी स्टुडिओ होता. त्यांचे ते स्वप्न त्यांनी पूर्ण केले होते. दरम्यान, नितीन देसाई यांनी त्यांचा स्टुडिओ विकत द्यावा म्हणून त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर यामागे मातोश्रीच्या निगडीत व्यक्ती असल्याचे देखील राणे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी,”नितीन देसाई हा एक चांगला माणून होता. ते फार मेहनती होते. माझे वैयक्तिक फार चांगले संबंध होते. पण देशाला आणि महाराष्ट्राला कळले पाहिजे की, त्यांनी स्टुडिओ विकत द्यावा असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा होता. इतकेच नाही तर राणे यांनी एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या मातोश्रीच्या निगडीत माणसाने नितीन देसाई यांना दिल्या होत्या, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, संजय राऊत यांच नाव न घेता राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘यंत्रणेला जो दिवसरात्र धमक्या देतोय, २०२४ ला नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार आणि हा आतमध्ये जाणार. कारण याने जे लोकांचे पैसे खाल्लेत, तुझं काही वाचणं नाही. तु आणि तुझ्या मालकाचा मुलगा दोघं आर्थर रोज जेलमध्ये जाणार असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी भाजपचे नेते खासदार सनी देओल यांच्य जुहू येथील बंगल्याचा प्रस्तावित लिलाव थांबवण्यात आला मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही मिळाला? असा सवाल संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना विचारला होता. दरम्यान राऊतांच्या या प्रश्नांनंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.





