प्रशांत महासागरात सापडला दुर्लभ ऑक्टोपस; संपूर्ण शरीरच पारदर्शक

वॉशिंग्टन – सागराच्या अंतरंगाचा शोध घेणाऱ्या सागरी संशोधकांना प्रशांत महासागरात एका दुर्लभ अशा ऑक्टोपसचा शोध लागला आहे. या ऑक्टोपसचे संपूर्ण शरीर पारदर्शक असून त्यामुळे या ऑक्टोपसला ग्लास ऑक्टोपस असे नाव देण्यात आले आहे. या ऑक्टोपसचे शरीर इतके पारदर्शक आहे की त्याच्या शरीरातील सर्व अवयवांचे दर्शन बाहेरून पाहणाऱ्याला होऊ शकते.
प्रशांत महासागरातील फिनिक्स आयलॅंडच्या जवळ हा दुर्लभ असा ऑक्टोपस सापडला. वैज्ञानिक भाषेमध्ये या ऑक्टोपसला व्हिटर्ले दोनाल्डो रिकार्डी असे म्हणतात.
या प्रकारचे ऑक्टोपस समुद्राच्या खाली खूप खोलवर आढळत असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूपच अवघड असते.संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत ग्लास ऑक्टोपसवर कोणत्याही प्रकारचे मोठे संशोधन झालेले नाही.
या ग्लास ऑक्टोपसचे शरीर 45 सेंटिमीटर पर्यंत लांब असू शकते. त्याचे डोळे चौकोनी असतात. सागरविषयक संशोधन करणाऱ्या शेमीडीत ओशन इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर डॉक्टर ज्योतिका विरमानी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आगामी कालावधीमध्ये या ऑक्टोपसवर आणखी संशोधन करण्याची गरज आहे.


