प्रशांत महासागरातील बेटे ‘हे’ मोठे देशच; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : प्रशांत महासागरातील बेटांच्या विकासाची गरज पूर्ण करणे ही भारताची जबाबदारी आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी प्रशांत महासागरातील छोट्या देशांच्या विकासाच्या मुद्यावरून अल्पसे भाष्य केले. प्रशांत महासागरातील बेटे म्हणजे केवळ छोटी बेटे नाहीत. तर ते मोठे समुद्री देश आहेत. या देशांचा भागीदार होणे हा भारताचा बहुमान आहे, असे जयशंकर म्हणाले.
प्रशांत महासागरातील द्विप देशांसमोर स्थायी विकास, वातावरण बदल, नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्यसेवा ही काही समान आव्हाने आहेत. या आव्हानांचा एकत्रित सामना केला जायला पाहिजे. या गरजा पूर्ण करणे ही भारताची जबाबदारी आहे, असे भारत मानत असल्याचे जयशंकर म्हणाले. प्रशांत महासागरातील देशांच्या विकासासाठी भारत नेहमीच काही जास्तीचे करायला तयार आहे, असेही जयशंकर म्हणाले. मार्शल आयलंडसमधील चार समुदाय विकास प्रकल्पांच्या विकासासाठी भारताकडून सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याच्या समारंभात जयशंकर बोलत होते.
या प्रकल्पांमध्ये एयलोक अतोल येथे क्रीडा संकुल, मेजित बेटावर विमानतळाचे टर्मिनल, अर्नो आणि वोटजे अतोल येथे कम्युनिटी सेंटर उभारण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मार्शल आयलंडमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याला मोठी मदत होईल, असेही जयशंकर म्हणाले. प्रशांत महासागरातील द्विप देशांच्या विकासासाठी भारताच्या पुढाकारातून आरोग्य सुविधा, गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर औषधांची उपलब्धता, निरोगीपणा आणि जीवनपद्धती, गुणवत्ता आणि क्षमता वृद्धी, एसएमइ क्षेत्रांचा विकास, नवीकरणीय उर्जा आणि स्वच्छ पाण्याच्या सुविधा आदी क्षेत्रांमधील सहकार्यावर भर दिला जाणार असल्याचेही जयशंकर यांनी सांगितले.
द्विपक्षीय संबंधांचा मोठा इतिहास
भारत आणि मार्शल आयलंड प्रजासत्ताकमध्ये द्विपक्षीय मैत्री संबंधांचा मोठा इतिहास आहे. हे संबंध अनेक वर्षांपासून विस्तार पावले आहेत. विशेषतः फोरम ऑफ इंडिया पॅसिफिक आयलंडस को-ऑपरेशन (फिपीक) सारख्या व्यासपीठांच्या माध्यमातून या संबंधांचा विस्तार झाला आहे. भारत आणि प्रशांत महासागरातील देशांदरम्यानच्या सहकार्यासाठी फिपीक एक मोठा आराखडा बनला आहे, असेही जयशंकर यांनी सांगितले.





