लक्षवेधी : ‘सुपर एल निनो’चे संकट
या वर्षीचा सुपर एल निनो (Super El Niño) उष्णकटिबंधीय पॅसिफिकमध्ये वेगाने आकार घेत आहे आणि हवामानशास्त्रज्ञांच्या मते 1950 पासूनच्या इतिहासातील ही सर्वात शक्तिशाली घटनांपैकी एक असण्याची दाट शक्यता आहे.

– डॉ. श्रीकांत कार्लेकर
Super El Niño : या वर्षीचा सुपर एल निनो (Super El Niño) उष्णकटिबंधीय पॅसिफिकमध्ये वेगाने आकार घेत आहे आणि हवामानशास्त्रज्ञांच्या मते 1950 पासूनच्या इतिहासातील ही सर्वात शक्तिशाली घटनांपैकी एक असण्याची दाट शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी एल निनोमुळे (Super El Niño) निर्माण होणार्या संभाव्य पावसाच्या तुटीची शक्यता वर्तवल्यामुळे, भारतीय हवामान विभाग कमकुवत मान्सूनच्या धोक्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. 2026 चा सुपर एल निनो हा पॅसिफिक महासागरात निर्माण होत असलेल्या अति-उष्ण पाण्याच्या पृष्ठभागाचा परिणाम आहे.
मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये समुद्राचे तापमान जेव्हा सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने अधिक वाढते, तेव्हा या स्थितीला ‘सुपर’ एल निनो म्हणतात.
विषुववृत्ताजवळ पश्चिमेकडे वाहणारे वारे कमकुवत झाल्यामुळे, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला साठलेले अतिउष्ण पाणी पूर्वेकडे (दक्षिण अमेरिकेच्या दिशेने) पसरू लागते.
जागतिक तापमानवाढीमुळे समुद्रातील उष्णतेचे प्रमाण विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. महासागराच्या पृष्ठभागाखालील हे अवाजवी उष्ण पाणी वर आल्यामुळे एल निनो (Super El Niño) अधिक तीव्र होत आहे. हरितगृह वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळे समुद्राच्या पाण्याचे मूळ तापमान आधीच वाढले आहे. यामुळे सामान्य एल निनो घटनादेखील ‘सुपर’ एल निनोमध्ये रूपांतरित होण्याचा धोका वाढतो.
या वर्षीच्या भारतीय मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याचे दिसते आहे. आज एल निनोचा शोध हा वार्षिक हवामानात आणि मोसमी पावसात होणारे जागतिक बदल नेमकेपणाने सांगणारा शोध आहे हे सर्वमान्य होत आहे. मात्र एल निनोची निर्मिती, विस्तार, तीव्रता आणि कालखंड यांचे भाकीत करण्यात म्हणावी तितकी अचूकता आलेली नाही.
एल निनो ही एक चक्रीय घटना असून काही वर्षांच्या अंतराने ती पुन्हा पुन्हा कार्यरत होते. ही यंत्रणा 7 वर्षांतून एकदा कार्यरत होते असे पूर्वी वाटत होते, मात्र नवीन संशोधनानुसार व हवामानाच्या सातत्याने घेतलेल्या आकडेवारीनुसार आता असे लक्षात येते आहे की ही घटना 4 ते 5 वर्षांतून एकदा घडते आहे. या चक्रीय घटनेत सातत्य आढळत नसल्यामुळे तिचे भाकीतही नेमकेपणाने करता येत नाही.
दक्षिण अमेरिकेच्या पेरू प्रांतातील मासेमारी करणार्या जमातींना, डिसेंबरनंतर किनार्याजवळून दक्षिणेकडे वाहणार्या उष्ण समुद्र प्रवाहाची, एकोणिसाव्या शतकापासूनच माहिती होती. हा प्रवाह ख्रिसमसनंतर वाहत असल्यामुळे त्यानी त्याचे नाव ‘एल निनो’ म्हणजे बाल येशू असे ठेवले. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी प्रदेशात म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्व बाजूस, अंटार्क्टिककडून येणार्या शीत प्रवाहामुळे नेहमीच थंड हवामान असते.
एल निनो प्रवाहाच्या निर्मितीनंतर या भागात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे सागरी हवामान तयार होते. हे हवामान खूपच वेगळे असल्याचे पेरुवासियाना जाणवत होते. अनियमितपणे तयार होणार्या एल निनो प्रवाहामुळे समुद्र पृष्ठाचे तापमान वाढून व त्यावरील हवा बाष्पाने संपृक्त होऊन भरपूर पाऊस पडतो. किनार्यावरील वाळवंटी प्रदेशाला तर हे वरदानच असते.
1932 मधे सर गिल्बर्ट वाकर हे भारतातील सर्व वेधशाळांचे डिरेक्टर जनरल होते. त्यावेळी त्यांनी भारतीय उपखंडातील मान्सून चक्राचा, 1877 व 1899च्या तीव्र दुष्काळाच्या संदर्भात सविस्तर अभ्यास केला. त्यानंतर 1930 मधे त्यांनी असे लक्षात आणून दिले की नैऋत्य प्रशांत महासागरात, वातावरणात चक्रीय स्वरूपाचे वार्षिक बदल होतात. त्यांनी या बदलांना दक्षिण दोलन असे म्हटले. या दोलनामुळे समुद्रावरील वायुभार, वारे, पर्जन्यमान या घटकात नैऋत्य प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर या प्रदेशात मोठे बदल होतात.
1960 पर्यंत या संबंधी खूपच सांख्यिकी तयार झाली आणि त्यामुळे हवामान व सागर शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की हे दक्षिण दोलन संपूर्ण प्रशांत महासागरावर पसरले आहे. यास walker circulation असे म्हटले जाऊ लागले. याचाच एक भाग म्हणजे एल निनो हा उष्ण सागरी प्रवाह.
उष्ण कटिबंधातील समुद्र पृष्ठावरचा पाण्याचा थर कमी घनतेचा, कमी खारट व तुलनेने अधिक उष्ण असतो. त्याखालचा थर मात्र थोड्या जास्त घनतेचा, अधिक खारट आणि थंड असतो. या दोन थरांच्या मधला थर सदैव बदलणार्या घनतेचा व उष्णतेचा असतो. या थराला Thermocline किंवा तापनती म्हणतात.सामान्य हवामान परिस्थितीत प्रशांत महासागरात पाण्याचा वरचा उष्ण थर व्यापारी वार्यांबरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असतो. त्यामुळे थर्मोक्लाइनची जाडी पश्चिमेकडे 150 ते 200 मीटर इतकी असते.
पूर्वेकडे ती केवळ 30 ते 50 मीटर एवढीच असते. पश्चिमी वारे व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे विषुववृत्ताकडून सागर पृष्ठावरील पाणी उत्तर व दक्षिण दिशेकडे जाऊ लागते. यामुळे समुद्र पृष्ठाच्या खालच्या थरातील थंड पाणी वर येते. मात्र रुंद थर्मोक्लाइनमुळे हे पाणी प्रशांत महासागरात पश्चिमेकडे जाऊ शकत नाही.पश्चिम प्रशांत महासागरात वर्षाच्या सुरुवातीलाच एल निनोसाठी याच्या उलट अशी पोषक परिस्थिती तयार होऊ लागते.
प्रशांत महासागराच्या पूर्व किनार्यावर वायुभार कमी झाल्यामुळे आणि पश्चिम किनार्यावर वाढल्यामुळे समुद्रावरचे उष्ण पाणी पूर्वेकडे सरकू लागते. त्याबरोबर लघुभाराचा, उर्ध्वगामी झालेला हवेचा पट्टाही पूर्वेकडे (Super El Niño) सरकू लागतो. अशा रितीने विषुववृत्तीय प्रदेशात पश्चिम पूर्व अशी मोठी लाटच तयार होते. ह्या लाटेला केल्विन वेव्ह म्हटले जाते. ही लाट दर सेकंदाला 3 मीटर या वेगाने पुढे सरकत राहते.
एप्रिलमधेच पेरूच्या किनार्यावर समुद्रपृष्ठाच्या तापमानात प्रचंड वाढ होऊ लागते. साधारणपणे डिसेंबरनंतर ही लाट प्रशांत महासागराच्या पूर्व किनार्यावर पोचते व ती दक्षिण व पूर्ववाहिनी होते. पुढील तीन ते चार महिन्यांत किनार्याला समांतर वाहात ती उत्तर व दक्षिण दिशेने पुढे सरकते. किनार्याला आपटून ही लाट परावर्तीत होते व पश्चिम वाहिनी रोसबी वेव्हज तयार होतात.
या प्रामुख्याने विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला आढळतात. या इतक्या संथ असतात की इथे एल निनोचा परिणाम पुढच्या 10 ते 12 वर्षांनी दिसून येतो. एल निनोच्या या निर्मितीचे परिणाम जागतिक पातळीवर होतात. ही घटना नेहमीच कमी जास्त तीव्रतेने घडत असली तरी काही वर्षी हा उष्ण प्रवाह इतका प्रबळ असतो की हवामानात मोठे बदल होऊन अतिवृष्टी होते. डिसेंबरमधे पूर्व प्रशांत महासागरात walker circulation अक्षरशः उद्ध्वस्त होते.






