रात्रीत वेगवान घडामोड…! मुरलीधर मोहोळ यांची माघार? मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; पडद्याआड नेमकं काय सुरूऐ?

Ajit Pawar | Muralidhar Mohol | महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीसाठी पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत. मात्र, आता एक मोठी घडामोड घडली आहे. या घडामोडीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची (एमओए) निवडणूक होत आहे. त्या अगोदर काल रात्री दोन्ही बाजूच्या उच्च पदस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत नेमका काय निर्णय झाला याची माहिती समोर आली नसली तरी, मुरलीधर मोहोळ निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : ‘मविआ’चा एल्गार ! निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत निघणार ‘सत्याचा मोर्चा’;कोणते नेतेमंडळी होणार सहभागी?
या निवडणुकीला राजकीय वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता त्या पद्धतीच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ही निवडणूक 2025 ते 2029 या काळासाठी अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासोबत पदाधिकाऱ्यांची देखील निवडणूक पार पडणार आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी दादा विरुद्ध अण्णा असा राजकीय सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीसाठी ६० सदस्य मतदान करणार असून संघटनेशी जोडलेल्या ३० संघटनांमधून प्रत्येक दोन जण मतदान करणार आहेत. यातून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाचा निर्णय आज शनिवारी होण्याची शक्यता आहे. मंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे. अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घेतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत नेमकं काय होणार, याची मोठी उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.
अखेर निर्णय झाला
या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला असल्याची माहिती मिळत असून, पहिले दोन वर्ष अजित पवार हे अध्यक्ष राहतील तर मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठ उपाध्यक्ष राहणार आहेत. दोन वर्षानंतर अध्यक्षपद हे मोहोळ यांच्याकडे देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.





