अहिल्यानगरचे आधुनिक गाडगेबाबा अनंतात विलीन; स्वच्छता दूत राम हरपल्याने शिरेगावावर शोककळा

नेवासा : तालुक्यातील शिरेगाव येथील गेली तीस वर्षांपासून स्वच्छता दूत म्हणून परिचित असणारे रावसाहेब लक्ष्मण होन उर्फ राम (वय ६०) यांचे श्रीराम नवमीच्या दिवशी निधन झाले. गेली अनेक वर्षांपासून श्री गाडगेबाबांचा आदेश व त्यांना गुरुस्थानी मानून शिरेगावच्या स्वच्छतेची सेवा राम करत होते. पाऊस पाणी, ऊन वारा याची तमा न बाळगता दैनंदिनी राम स्वच्छतेचे पाऊल उचलत होता.
मारुती मंदिराचा प्रांगण, वेशी समोरील परिसर व रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमीची जागा व त्याचा परिसर आशा अनेक ठिकाणी राम स्वच्छता करायचा. गेली तीस वर्षे ज्यांनी गावाला आणि रामनामाला समर्पित जीवन जगलं, अशा या व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण शिरेगाव हळहळून गेलं आहे.
स्वच्छता दूत म्हणूनच माझा जन्म
राम दोन उंच बांबू वर पाय ठेवून पंढरपूर ची वारी करत होता. तसेच स्वच्छता दूत म्हणूनच माझा जन्म झाला असे तो नेहमी म्हणायचा, परिसराची व गावाची स्वच्छता राम नेहमी नेटाने करत असे, रात्री उशिरापर्यंत त्याची झाड लोट सुरू असायची, विशिष्ट ठिकाणी कचरा नेहून तो पेटून देत असत, श्रीराम नवमीच्या दिवशीच राम ने जगाचा निरोप घेतला. खऱ्या अर्थाने शिरगावकरांचा स्वच्छतादूत हरपला आहे. अंत्यविधीसाठी परिसरातील व शिरेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भव्य मिरवणूक काढून व सजवलेल्या रथात रामला शेवटचा निरोप देण्यात आला.
आधुनिक गाडगेबाबा म्हणून संबोधन
दररोज सकाळी आणि संध्याकाळी राम होन गावातील मंदिर, रस्ते, वेशी, ग्रामपंचायत, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे झाडत. एक हातात झाडू आणि ओठांवर ‘रामनाम’, हा त्यांचा दिनक्रम होता. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी ही सेवा अखंड सुरू ठेवली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना गावात ‘आधुनिक गाडगेबाबा’ असे संबोधन मिळाले. गावात दरवर्षी होणाऱ्या हरिनाम सप्ताहामध्ये राम होन यांचा उत्स्फूर्त सहभाग असे.
आम्हा शिरेगावकरांसाठी राम एक स्वच्छता दूत म्हणून नेहमी लक्षात राहील, त्याच्या निधनाने शिरेगावकर पोरके झाले आहेत. राम यांची नेहमी प्रत्येक कार्यात उणीव भासत राहील हे नक्की आहे. ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
– शिरेगावातील ग्रामस्थ





