जालना : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकरांवर टीका करत त्यांना इशारा दिला आहे. रावसाहेब दानवे हा काही कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या पराभवाचे शल्य बोलून दाखवले. अनेक महाभाग आपल्या पराभवाचे क्रेडिट घेत आहेत, पण आम्ही युतीतले माणसं असून बेइमानी करणार नाही असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता अर्जुन खोतकर यांना टोला लगावला आहे. काय म्हणाले होते अर्जुन खोतकर? जालना विधानसभेच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. ज्यांनी संकटात टाकलं त्यांना कधी सोडायचं नसतं आणि त्यांच्यापासून सावध पण राहायचं असतं. आता आपल्याला सावध राहण्याची वेळ आलेली आहे. ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं आम्हाला त्रास दिला त्याचा सत्यानाश झाला असं म्हणत अर्जुन खोतकर आणि अप्रत्यक्षरीत्या रावसाहेब दानवे यांच्यावरती टीका केली होती. जालना विधानसभेवरून घमासान जालना विधानसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. परंपरेप्रमाणे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या जागेवरती आता भाजपकडून दावा केला जातोय. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.