Basangouda Patil Yatnal | Ranya Rao : कन्नड आणि तमिळ चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री रान्या रावला मंगळवारी ४ मार्च रोजी बंगळुरू विमानतळावरून पोलिसांनी अटक केली. तिच्या अटकेनंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. बंगळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे तब्बल १२ कोटी रुपयांचे सोनं आढळून आल्याने सदर कारवाई करण्यात आली. अभिनेत्री रान्या रावला ही दूबईहून परतत असताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे हे सोनं आढळून आले. पोलिसांनी तिला अटक केल्यानांतर तिच्या घरावरही छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २.६७ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. तसेच पोलिसांनी तिच्या घरातून तीन मोठे बॅाक्सदेखील जप्त केले आहेत. पोलिसांनी कारवाईत एकूण १७.२९ कोटी रुपये जप्त केले आहेत. सध्या अभिनेत्रीचा मुक्काम पोलीस कोठडीत आहे. अश्यातच, कर्नाटकातील भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांनी अभिनेत्री बद्दल अत्यंत अश्लील टिप्पणी केली आहे. ‘तिने शरीरात जागा मिळेल तिथे सोनं लपवून ठेवलं होतं, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कर्नाटकचे भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील यटनाल म्हणाले, तिच्या संपूर्ण शरारीत सोनं होतं. जिथं-जिथं छिद्र होतं, तिथं-तिनं सोनं लपवून ठेवलं होतं.” या प्रकरणात राज्याचे मंत्री सामील असल्याचा दावाही यटनाल यांनी केला आणि विधानसभेच्या अधिवेशनात त्यांची नावे सांगणार असल्याचे सांगितले. “या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व मंत्र्यांची नावे मी विधानसभेच्या अधिवेशनात सांगेन. तिच्या नातेसंबंधांबद्दल, तिला सुरक्षा मिळवून देण्यात कोणी मदत केली आणि सोने कसे आणले याबद्दल मी संपूर्ण माहिती गोळा केली आहे. तिने सोने कुठे लपवले आणि ते कसे तस्करी केले यासह मी अधिवेशनात सर्वकाही उघड करेन,” असे आमदार म्हणाले. अभिनेत्रीच्या जॅकेटमधून सोनं केलं जप्त बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्या उतरली. तिच्या हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून होते. तिने पोलिस कॉन्स्टेबल बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणीला बायपास करण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न फसला आणि ती पोलिसांनी रंगहाथ सापडली. यानंतर अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीच्या जॅकेटमधून १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोनं जप्त केलं. रान्या राव कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे.