Beed News : रणजीत कासलेचा दावा अन् बीडच्या कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली; काय आहे प्रकरण?

Walmik Karad On Ranjit Kasale | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सध्या बीडच्या कारागृहात आहे. मात्र येथे त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केला आहे. त्याच जिल्हा कारागृहामध्ये रणजीत कासलेला ठेवण्यात आले होते.
मात्र, जामिनावर बाहेर येताच रणजित कासलेने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे सांगितले होते. कासलेच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता कारागृह अधीक्षकांची तडकफडकी बदली करण्यात आली आहे. बक्सार मुलानी असं बदली करण्यात आलेल्या कारागृह अधीक्षकाचे नाव आहे.
त्यांच्या जागी आता रत्नागिरीचे रामराजे चांदणे हे कारागृह अधीक्षकपदी रुजू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केलेल्या आरोपानंतर तत्काळ कारागृह अधीक्षकांची बदली झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
रणजीत कासलेचे आरोप काय?
रणजीत कासलेने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे सांगितले आहे. कराडला बीडच्या कारागृहात स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात. स्वतः सह इतर कैद्यांच्या नावावर तो 25 हजारांची खरेदी कारागृहातील कँटीनमधून करत असल्याचा आरोप बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेने केला आहे.
इतर कैद्यांना कारागृहातील कँटीनमधून खरेदीचा नियम लावला जातो. मात्र कराड हा स्वतः 15 हजार तर इतर कैद्यांच्या नावावरही 10 हजार अशी सुमारे 25 हजारांची खरेदी करतो. मी कारागृहात राहून कराडला मिळणारी व्हीआयपी वागणूक समोर आणेल या भीतीपोटी मला सुरक्षेचे कारण देत छत्रपती संभाजी नगरला हलवण्यात आले होते, तर कराडला इतरत्र हलवण्याची मागणी आपणच कारागृहातून अर्जाद्वारे केली होती असे कासले व्हिडिओत म्हणाला. Walmik Karad |





