Maharashtra Beat Bengal : रणजी करंडकात महाराष्ट्राने बंगालचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा, पृथ्वी शॉने झळकावले नाबाद अर्धशतक
Maharashtra Beat Bengal : रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राने बंगालला १० गडी राखून पराभूत करत त्यांची विजयी मालिका संपुष्टात आणली. ज्यामध्ये पृथ्वी शॉने नाबाद अर्धशतकी खेळी साकारली.

Ranji Trophy Maharashtra Beat Bengal Prithvi Shaw Fifty Eden Gardens : रणजी करंडक एलिट ग्रुप ‘सी’ मधील अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने बंगालचा १० गडी राखून लाजिरवाणा पराभव केला. ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या या सामन्यात विजय मिळवत महाराष्ट्राने बंगालचा सलग तीन विजयांचा वारू रोखला. विजयासाठी मिळालेले ११२ धावांचे माफक लक्ष्य सलामीवीर पृथ्वी शॉ आणि युवा फलंदाज सचिन धस यांनी अवघ्या १९.४ षटकांत एकही विकेट न गमावता सहज पार केले.
पृथ्वी शॉचा पलटवार; कुटल्या नाबाद ५३ धावा –
गेल्या काही सामन्यांतील सुमार कामगिरीनंतर स्टार फलंदाज पृथ्वी शॉने या डावात जोरदार पुनरागमन केले. त्याने अवघ्या ५० चेंडूंत ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ५३ धावा फटकावल्या. दुसऱ्या बाजूने सचिन धसने ६८ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ६१ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात केवळ १२ धावांवर मोहम्मद शमीचा शिकार ठरलेल्या शॉसाठी हे नाबाद अर्धशतक प्रचंड आत्मविश्वास देणारे ठरले आहे.
गोलंदाजांचे वादळ; बंगालचा पहिला डाव १४३ धावांत गुंडाळला
🚨 First loss for Bengal in the ongoing Ranji Trophy season
Maharashtra win by 10 wickets and stay unbeaten!
@CabCricket #RanjiTrophy https://t.co/5JlerWDZxQ
— RevSportz Global (@RevSportzGlobal) November 5, 2026
महाराष्ट्राच्या या मोठ्या विजयाचा पाया गोलंदाजांनी पहिल्याच डावात रचला होता. त्यांनी बंगालचा पहिला डाव अवघ्या १४३ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात तनाय सांघवीच्या झुंजार ६० धावांमुळे महाराष्ट्राने २१८ धावा करत ७५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली होती. त्यावेळी बंगालकडून शमीने ४ तर शाहबाज अहमदने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
प्रदीप दाधे, हितेश वाळुंजची फिरकी; बंगाल १८६ धावांवर गारद
Maharashtra beat Bengal by 10 wickets at Eden Gardens. Prithvi Shaw makes 53* and Sachin Dhas 61* as they reach 114/0 in 19.4 overs, chasing 112. Pradeep Dadhe and Hitesh Walunj take four wickets each in Bengal’s second-innings 186. #RanjiTrophy #Maharashtra https://t.co/FvhRDKMMQc
— Harshit singh (@Harshit92135329) November 5, 2026
दुसऱ्या डावात अभिषेक पोरेल (६५) आणि सुमंता गुप्ता (५९) यांनी लढा दिला; मात्र महाराष्ट्राच्या प्रदीप दाधे आणि हितेश वाळुंज या फिरकी जोडीने प्रत्येकी ४ विकेट्स घेत बंगालचा डाव १८६ धावांवर रोखला. त्यामुळे महाराष्ट्रासमोर ११२ धावांचे सोपे आव्हान राहिले होते, जे सलामीवीरांनी नाबाद ११४ धावांची भागीदारी रचून पूर्ण केले.
बोनस गुणासह महाराष्ट्र अव्वल स्थानी; सांघवी सामनावीर –
१० गडी राखून मिळवलेल्या या दणदणीत विजयामुळे महाराष्ट्राला १ बोनस गुणासह एकूण ७ गुण मिळाले आहेत. यासह महाराष्ट्र १९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला असून, बंगाल १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पहिल्या डावात नाबाद ६० धावा आणि सामन्यात ५ विकेट्स घेणाऱ्या तनाय सांघवीला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.





