रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : यजमान महाराष्ट्राचा आजपासून झारखंडशी सामना…

पुणे – देशांतर्गत स्पर्धेतील सर्वात महत्वाच्या मानल्या जात असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आजपासून (शुक्रवार) यजमान महाराष्ट्राचा सामना झारखंडशी होणार आहे. हा सामना गहुंजे येथील महाराष्ट्र क्रकेट संघटनेच्या मैदानावर होणार आहे.
हा सामना जिंकत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज आहे. यंदाच्या मोसमातील या स्पर्धेच्या सोलापूरला झालेल्या सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राने घरच्या मैदानावर मणिपुरचा डावाने पराभव केला होता. या सामन्यात महाराष्ट्राने मणिपूरचा पहिला डाव १३७ धावांवर गुंडाळत आपल्या पहिल्या डावात ३२० धावा केल्या होत्या. त्यात अंकित बावणेने दीडशतकी खेळी केली होती.
#INDvAFG 1st T20 : शिवम दुबेची मॅचविनिंग खेळी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय…
त्यानंतर महाराष्ट्राने मणिपुरचा दुसरा डाव ११४ धावांवर संपूष्टात आणताना हा सामना एक डाव आणि ६९ धावांनी जिंकला होता. आता झारखंडविरुद्धही असेच वर्चस्व राखण्याचा कर्णधार केदार जाधवच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचा प्रयत्न राहिल. यंदाच्या मोसमात अनुभवी केदारकडेच संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असल्याने आता त्याच्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. यंदाच्या स्पर्धेतील महाराष्ट्राचा संघ पाहिला तर संघाची फलंदाजी व गोलंदाजी अत्यंत सक्षम असल्याचेच पहिल्या सामन्यातून दिसून आले आहे.





