Mumbai Bomb Threat : मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी; सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपासणी
या धमकीनंतर रेल्वे सुरक्षा दल, सरकारी रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या जवानांनी स्थानकावर शोधमोहीम सुरू केली.

Mumbai Bomb Threat – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी या गजबजलेल्या रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली असता, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी ६:४० च्या सुमारास वाडी बंदर येथील सरकारी रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता.
या धमकीनंतर रेल्वे सुरक्षा दल, सरकारी रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या जवानांनी स्थानकावर शोधमोहीम सुरू केली.
या मोहिमेत आरपीएफच्या श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म, पादचारी पूल आणि पार्सल विभाग अशा संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली.
मात्र, स्थानक परिसरात किंवा कोणत्याही रेल्वेगाडीत कोणतीही संशयास्पद व्यक्ती, स्फोटक पदार्थ किंवा बेवारस वस्तू आढळली नाही. सध्या सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, सीएसएमटीसह रेल्वे नेटवर्कवरील इतर स्थानकांवरही कडक पहारा ठेवण्यात आला आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





