IND vs SA 1st T20 Match Result : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. भारताने डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्याच T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.आंतरराष्ट्रीय टी-20 मधील भारताचा हा सलग 11 वा विजय आहे.
भारतीय संघाच्या विजयात संजू सॅमसनचे शतक, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्तीच्या घातक गोलंदाजीची भूमिका महत्त्वाची ठरली. सॅमसनने 107 धावा केल्या, तर बिश्नोई आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.संजू सॅमसन सामन्याचा मानकरी ठरला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या 107 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 17.5 षटकांत सर्वबाद केवळ 141 धावा करता आल्या.आता टीम इंडियाच्या नजरा 10 नोव्हेंबरला खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20वर असतील.
दक्षिण आफ्रिकेसाठी केवळ हेनरिक क्लासेन (25), जेराल्ड कोएत्झी (23) आणि सलामीवीर रायन रिक्लेटन (21) यांना 20 धावांचा टप्पा ओलांडता आला.याशिवाय इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. यामध्ये डेविड मिलर (18),एडेन मारक्रम (08),ट्रिस्टन स्टब्स (11),पैट्रिक क्रूगर (01) आणि एंडिले सिमेलेन (06) हे मोठी खेळी करू शकले नाही.
भारताकडून वरुण चक्रवती आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी तीन तर आवेश खानने दोन बळी घेतले. त्याचवेळी अर्शदीप सिंगने एक विकेट आपल्या नावावर करण्यात यश मिळवले.वरुणने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 25 धावा देत तीन मोठ्या विकेट घेतल्या. भारतीय फिरकीपटूने हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी,दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर संजू सॅमसनच्या तूफानी शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 षटकांत आठ गडी गमावून 202 धावा केल्या.
टीम इंडियासाठी संजू सॅमसनने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने अवघ्या 47 चेंडूत शतक झळकावले. सॅमसन याने सामन्यात 50 चेंडूंचा सामना करताना 107 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 10 षटकार आणि 7 चौकार मारले. पीटरच्या गोलंदाजीवर ट्रिस्टन स्टब्सने त्याचा झेल पकडला आणि सॅमसनची वादळी खेळी संपुष्टात आली.
संजू व्यतिरिक्त तिलक वर्माने 18 चेंडूत 33 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव 21 धावा करून बाद झाला. याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. हार्दिक पांड्या केवळ 2 धावा करू शकला, तर रिंकू सिंगही केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. टी-20 संघात पुनरागमन करणारा अक्षर पटेलही काही विशेष करू शकला नाही, त्याने 7 चेंडूत 7 धावा केल्या.
अशा प्रकारे भारताने 20 षटकात 8 विकेट गमावून 202 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत गेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक 3 बळी घेतले. यासाठी त्यानं 4 षटकात 37 धावा खर्च केल्या. मार्को जॅनसेन, केशव महाराज, पीटर आणि पॅट्रिक यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संजू सॅमसननं रचला इतिहास..
संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं आहे. सॅमसनने याआधी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात 111 धावांची इनिंग खेळली होती. आता पुढच्याच डावात सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले आहे. यासह संजू सॅमसन आफ्रिकेविरूध्द शतक झळकावून इतिहास रचला आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सलग दोन शतके झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजू सॅमसनपूर्वी सलग दोन शतक करण्याची किमया तीन फलंदाजांनी साधली आहे. त्याच्याआधी फ्रान्सचा गुस्ताव्ह मॅककीन, दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो आणि इंग्लंडचा फिल सॉल्ट यांनी टी-20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे आणि आता संजू सॅमसनने अशी कामगिरी केली आहे.