Ranji Trophy 2024-25 (Mumbai vs Baroda) :- बडोद्याने रणजी ट्रॉफी 2024-25 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात सोमवारी मुंबईचा लाजीरवाणा पराभव केला. गट अ च्या या सामन्यात गतविजेत्या मुंबईला 84 धावांनी पराभवाला सामोरं जावे लागले. बडोद्याने 26 वर्षांनंतर मुंबईला रणजी ट्रॉफीमध्ये पराभूत केले आहे. विजयासाठी 262 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 42 वेळचा चॅम्पियन मुंबईचा संघ 48.2 षटकात 177 धावांत सर्वबाद झाला.
कर्णधार कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाच्या विजयात डावखुरा फिरकीपटू भागर्व भट्टने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. सोमवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी बडोद्याने बाजी मारली. सामना चढ-उतारांनी भरलेला होता पण शेवटच्या दिवशी 34 वर्षीय भट्टने दिवस गाजवला. त्याने दुसऱ्या डावात 55 धावांत सहा बळी घेत मुंबईची फलंदाजी उद्ध्वस्त करून आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. भार्गव भट्टने पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. सामन्यात त्याने एकूण 10 विकेट घेतल्या. या कामगिरीबदल या फिरकीपटूला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
मोठी गोष्ट म्हणजे मुंबई संघात अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर सारखे दिग्गज खेळाडू होते पण असे असतानाही बडोद्याने मुंबईचा पराभव केला. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बडोद्याने पहिल्या डावात 290 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 214 धावांवरच मर्यादित राहिला, त्यानंतर बडोद्याला दुसऱ्या डावात 185 धावा करता आल्या आणि त्यानंतर मुंबईला विजयासाठी 262 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, मुंबईचा संघ अवघ्या 177 धावांत गडगडला.
मुंबईच्या दिग्गज खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर ते अपयशी ठरले. पृथ्वी शॉने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 12 धावा केल्या, तर कर्णधार रहाणे पहिल्या डावात 29 आणि दुसऱ्या डावात 12 धावांचे योगदान देऊ शकला. श्रेयस अय्यर पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात त्याला केवळ 30 धावा करता आल्या. एकूणच मुंबई संघाला सर्फराज खान आणि मुशीर खान यांची उणीव जाणवली. सर्फराज टीम इंडियाशी संबंधित आहे आणि मुशीर खान रस्त्याच्या अपघातात जखमी झाला आहे.
शेवटच्या दिवशी मुंबईला विजयासाठी 220 धावांची गरज होती आणि आठ विकेट्स शिल्लक होत्या. चौथ्या दिवशी मुंबईने दुसऱ्या डावात 2 बाद 42 पासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. यावेळी आयुष्य म्हात्रे 19 व कर्णधार अजिंक्य रहाणे 4 धावांवर खेळत होते. बडोदा संघाच्या भार्गव भटने प्रथम अजिंक्य रहाणेचा (12) अडसर दूर केला. त्यानंतर आयुष्य म्हात्रे देखील 22 धावांवर परतला. सर्वाधिक धावा करणारा सिद्धेश लाड (59) आणि श्रेयस अय्यर (30) वगळता मुंबईचा इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकला नाही. सिद्धेश लाडने 94 चेंडूत 59, श्रेयसने 37 चेंडूत 30 धावाची खेळी करताना लढत दिली. यानंतर मात्र भार्गव भटने कोणत्याही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही. भार्गवने 55 धावांमध्ये 6 गडी बाद करताना संघाला विजय मिळवून दिला. त्याला महेश पिठीयाने 2 तर जे. सिंगने 1 गडी बाद करताना सुरेख साथ दिली.