Ranji Trophy 2023-24 : द्विशतकासह चेतेश्वर पुजाराने रचला इतिहास, सर डॉन ब्रॅडमनच्या यादीत झाला सामील…

Most Double Hundred In Ranji Trophy 2023-24 : चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये द्विशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या पुजाराने झारखंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात 243* धावांची इनिंग खेळली. या द्विशतकासह पुजाराने एक खास विक्रम केला आहे. या द्विशतकासह, पुजारा प्रथम श्रेणीत सर्वाधिक द्विशतके झळकावणारा संयुक्त चौथा फलंदाज ठरला. दुहेरी शतकासह पुजारा ऑस्ट्रेलियन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत सामील झाला.
The moment when Cheteshwar Pujara completed his 200…!!!
– What a way to kick off 2024 Ranji Trophy season.pic.twitter.com/cS8z9l983C
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 7, 2024
पुजाराचे हे प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील 17 वे द्विशतक होते. झारखंडविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पुजाराने द्विशतक पूर्ण केले. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने 30 चौकारांच्या मदतीने 243* धावा केल्या. प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारा फलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज सर डॉन ब्रॅडमन, ज्यांनी 37 द्विशतके झळकावली. यानंतर इंग्लंडचा माजी दिग्गज वॅली हॅमंड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 36 द्विशतके झळकावली आहेत.
त्यानंतर या यादीत तिसरे नाव आहे इंग्लंडच्या पॅटसी हेंड्रेनचे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 22 द्विशतके झळकावली. यानंतर इंग्लंडचा हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लंडचा रामप्रकाश आणि भारताचा चेतेश्वर पुजारा 17-17 प्रथम श्रेणी द्विशतकांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारे फलंदाज
37 द्विशतके – ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)
36 द्विशतके – हॅमंड (इंग्लंड)
22 द्विशतके – हेंड्रेन (इंग्लंड)
17 द्विशतके – सटक्लिफ (इंग्लंड)
17 द्विशतके – रामप्रकाश (इंग्लंड)
17* द्विशतके – पुजारा (भारत).
सौराष्ट्राने उभारली मोठी धावसंख्या….
पहिल्या डावात फलंदाजी करताना सौराष्ट्रने 8 विकेट्सवर 578 धावा करून डाव घोषित केला. संघासाठी पुजाराने 243* आणि प्रेरक मांकड़ 104* धावा केल्या, ज्यात 12 चौकारांचा समावेश होता.





