Ranjangaon MIDC: चाकणनंतर आता रांजणगावमध्येही स्थलांतर? पुणे-नगर महामार्गावरील कोंडीमुळे उद्योजक हैराण
Ranjangaon MIDC: वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडीमुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे कंबरडे मोडले.

Ranjangaon MIDC – “उद्योग आणा, रोजगार वाढवा” अशी घोषणा करत मोठ्या थाटामाटात औद्योगिक वसाहती उभारल्या जातात; मात्र, त्या उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेच नसतील, तर उद्योग टिकणार कसे? चाकण एमआयडीसीतील कंपन्या वाहतूक कोंडीला कंटाळून स्थलांतराचा विचार करत असल्याचे वृत्त समोर येताच जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. वरिष्ठ पातळीवर तातडीच्या बैठका घेतल्या जात आहेत.
मात्र, चाकणपुरतेच प्रशासनाचे डोळे उघडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंचताराकिंत रांजणगाव एमआयडीसीतील वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजली आहे. त्यावर तोडगा निघत नाही. यावर उद्योगविश्वातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहत ही पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची औद्योगिक पट्टा आहे. हजारो कामगार दररोज येथे रोजगारासाठी येतात.
मात्र, पुणे ते रांजणगाव या मार्गावर वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडीने उद्योगांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. रांजणगाव एमआयडीसीमधून रांजणगावपर्यंत अवघ्या पाच मिनिटांत पोहोचणाऱ्या वाहनांना आता वाहतूक कोंडीमुळे १५ ते २० मिनिटे लागत आहेत. पुण्यापासून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तर अवस्था आणखी बिकट आहे.
कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळाचा पाच ते सहा तासांचा मौल्यवान वेळ प्रवासातच वाया जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कामाचे तास कमी आणि रस्त्यावरचे तास अधिक, अशी अवस्था झाल्याने कामगारांमध्येही नाराजी वाढत आहे.
उत्पादनक्षमतेवर दूरगामी परिणाम
वाहतूक कोंडीचा थेट परिणाम कंपन्यांच्या उत्पादनक्षमतेवर होत आहे. कर्मचारी वेळेवर पोहोचत नाहीत, वाहतूक खर्च वाढतो, मालवाहतुकीला विलंब होतो आणि नियोजन कोलमडते. अशा परिस्थितीत “रांजणगावमध्ये उद्योग ठेवायचे तरी कशासाठी?” असा प्रश्न काही उद्योगांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे. चाकण एमआयडीसीतील कंपन्यांच्या स्थलांतराच्या चर्चेने प्रशासन हादरले असताना, रांजणगावमधील उद्योगांनीही भविष्यात स्थलांतराचा निर्णय घेतला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे.
महामार्गाचे काम सुरू झाल्यावर कोंडीचा स्फोट?
पुणे रस्त्याच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले. मात्र, काम पूर्ण कधी होणार आणि काम सुरू असताना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुणे – नगर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर सध्याची वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच पाच-सहा तास प्रवासात घालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात आणखी किती वेळ रस्त्यावर अडकवणार, हा प्रश्न गंभीर आहे.
उद्योगांसाठी मोठ मोठ्या घोषणा, भूमिपूजने आणि उद्घाटने केली जातात. रोजगार निर्मितीचे आकडे सांगितले जातात. मात्र, उद्योग सुरू झाल्यानंतर त्या उद्योगांना सक्षम रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि पर्यायी मार्ग देण्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरीत राहत आहे.






