रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती ते गणेगाव आणि वाघाळेकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता सध्या विकृत झाला असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रांजणगाव गणपती येथून कॅनॉलपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी लेखी मागणी वाघाळे येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) पुणे येथील बलशेटवार साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. रस्त्यावर खडी बाहेर आल्यामुळे दुचाकीस्वारांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचा धोका अधिक वाढत आहे. या मार्गावरून दररोज गणेगाव, वाघाळे व परिसरातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. रांजणगाव एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगारांची देखील या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र खराब रस्त्यामुळे प्रवास अत्यंत धोकादायक बनला असून वाहनांच्या नुकसानीमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित विभागाकडून वारंवार केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि काही दिवसांनंतर पुन्हा खड्डे उघडे पडतात. त्यामुळे येथे कायमस्वरूपी दर्जेदार काम व्हावे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नाही. संबंधित विभागाने त्वरित खड्डे बुजवून रस्ता चांगल्या स्थितीत करावा, अन्यथा नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. – अशोक सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते हेही वाचा : Pune District : पुरंदर तालुक्यात दम मारो दम; हुक्का पार्लरचा विळखा : तरुण पिढी व्यसनाधीन