पुणे पीपल्सच्या अध्यक्षपदी रणदिवे; मिलिंद वाणी यांची उपाध्यक्षपदी निवड

पुणे – पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंक लि., पुणेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली 17.10.2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत सीए जनार्दन रणदिवे यांची अध्यक्ष म्हणून व मिलिंद वाणी यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
रणदिवे हे व्यवसायाने चार्टर्ड अकौन्टंट असून त्यांनी अनेक सहकारी बॅंकांवर विविध पदांवर काम केले असून ते मे. प्रास ऍण्ड असोसिएट्स एलएलपी या फर्मचे संस्थापक भागीदार आहेत. मिलिंद वाणी हे उद्योजक असून त्यांना नॅनो टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे पीपल्स को-ऑप. बॅंक ही मल्टिस्टेट को-ऑप. बॅंक असून 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षात बॅंकेने व्यवसायाचा 2,300 कोटीचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ठेवी रु.1401 कोटी, कर्जे रु. 918 कोटीचा समावेश आहे.
बॅंकेची निव्वळ एन.पी.ए. 0%, सी.डी. रेशो 65.52%, निव्वळ नफा रु.13.72 कोटी आहे. बॅंकेने वर्षीही 12% दराने लाभांश दिल्याची तसेच बॅंकेस सातत्याने अ ऑडिट वर्ग मिळत असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांनी दिली. 21 शाखा व एका विस्तारीत कक्षासह बॅंक 71 वर्षांपासून वाटचाल करीत आहे. आगामी काळात इतर जिल्ह्यात शाखा विस्तार करणे, इंटरनेट बॅंकिंग सुरू करणे, शेड्युल्ड बॅंकेचा दर्जा प्राप्त करणे आदी उद्दिष्टे असल्याचे रणदिवे यांनी नमूद केले.





