पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला ‘पिट्या भाई’ म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असलेल्या परदेशी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज दिसले. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ज्यांना काम करण्याची इच्छा नसेल, त्यांनी तातडीने आपलं पद सोडावं. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेताना विचारले, “इतके दिवस काय काम केले हे दाखवा!” पक्षाने दिलेले काम, विशेषतः मतदार याद्या पूर्ण करण्याचे काम का केले गेले नाही, असा थेट सवाल त्यांनी केला. “आधी मतदार याद्या तयार करा आणि मगच बैठकीला या,” असे स्पष्ट आदेश देत त्यांनी बैठकीत काम न करणाऱ्यांना चांगलेच झापले. शहरातील संकल्प हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीला पुण्यातील सर्व शाखा अध्यक्ष, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष रमेश परदेशी यांना त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून चांगलंच फटकारलं होतं. काही दिवसांपूर्वी रमेश परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. संघाचा कट्टर कार्यकर्ता असा फोटो राज ठाकरेंनी बघितल्याने त्यांनी परदेशी याला कार्यकर्त्यांच्या समोर झापलं. “छाती ठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे, कशाला टाईमपास करतो, एकाच ठिकाणी कुठे तरी राहा..” असे म्हणत राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना चांगलेच सुनावले होते. यानंतर या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः रमेश परदेशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. रमेश परदेशी म्हणाले, “आजची पक्षांतर्गत बैठक होती. मागील बैठकीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मतदार यादी संदर्भात राज ठाकरे यांनी एक टास्क दिला होता. बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी तो टास्क पूर्ण केला नव्हता. त्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर मतदार याद्यांवर काम करणं आवश्यक असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ‘आरएसएस’ संचलनातील फोटोबाबत राज ठाकरेंनी खडसवल्याबाबत चर्चा सुरू आहेत. यावर विचारले असता परदेशी म्हणाले, राज ठाकरे साहेबांचं बोलण्याचं टायमिंग परफेक्ट आहे आणि त्यांचा मिश्कील स्वभाव देखील सर्वांना माहित आहे. बैठक सुरू असताना त्यांचा अचानकपणे माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी विचारलं, फोटोचं काय आहे? त्यावर मी उत्तर दिलं आहे. इतकंच साधं संभाषण झालं.” असं ते म्हणाले होते. मनसेला ‘जय महाराष्ट्र’ राज ठाकरे यांनी खडसावल्यानंतर रमेश परदेशी यांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील आपला एक जुना फोटो फेसबुकवर पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यांनी “मी माझ्या विचारांसोबत, राष्ट्र प्रथम” अशी टॅगलाइन वापरत, “जय हिंद, जय महाराष्ट्र” असे कॅप्शन दिले आणि अप्रत्यक्षपणे मनसे सोडल्याची अधिकृत घोषणा केली. थोड्याच वेळात परदेशी यांनी थेट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर झाले.