Teacher Award : रामचंद्र अय्यर यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
Teacher Award : न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु.चे उपशिक्षक रामचंद्र अय्यर यांना ३५ वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Teacher Award : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बु. येथील उपशिक्षक रामचंद्र अय्यर यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी ही माहिती दिली.
जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघ आणि जुन्नर तालुका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते नुकताच अय्यर यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रामचंद्र अय्यर यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकाळात विद्यालयाच्या शैक्षणिक आणि विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विभागाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी तांत्रिक विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
गायन आणि वादन क्षेत्रातही अय्यर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी तालुका तसेच जिल्हास्तरावर विशेष कामगिरी केली. सह्याद्री आणि आकाशवाणीच्या विद्यालयीन कार्यक्रमांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय विद्यालयासाठी निधी संकलनाच्या कामातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रमास टीडीएफचे अध्यक्ष जी. के. थोरात, कार्यवाह के. एस. ढोमसे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. छाया तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे, उल्का मोरे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष पंकज घोलप, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष गणेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, शिरोलीचे सरपंच प्रदीप थोरवे, पर्यवेक्षक राजकुमार गंभीर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश थोरवे, आजी-माजी विद्यार्थी आणि शिरोली बुद्रुकमधील ग्रामस्थांनी रामचंद्र अय्यर यांचे विशेष अभिनंदन केले.





