Ramayana : ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक धमाका.! गाठला 1000 कोटींचा टप्पा, रचला नवा इतिहास
'रामायण'ने आठ दिवसांत १,००० कोटींचा टप्पा पार केल्यामुळे आता त्याची तुलना भारतीय सिनेसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांशी केली जात आहे.

Ramayana – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री साई पल्लवी आणि अभिनेता यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रचंड चर्चेत असलेल्या या बिग बजेट चित्रपटाने आता कमाईच्या बाबतीत नवा इतिहास रचला आहे.
अवघ्या आठ दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर १,००० कोटी रुपयांचा टप्पा पार करत चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने आठव्या दिवशीही कोट्यवधींची कमाई करत आपली घोडदौड कायम ठेवली आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या पुढील कमाईकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटात रणबीर कपूरने भगवान श्रीरामांची भूमिका साकारली आहे, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. यशने रावणाची भूमिका साकारली आहे. भव्य सेट, दमदार कलाकार आणि रामायणाच्या कथेला आधुनिक सिनेमॅटिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासूनच मोठी उत्सुकता होती.
रामायण बॉक्स ऑफिस कलेक्शन :
‘रामायण: पार्ट १’ च्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल सांगायचे झाल्यास, इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये मिळून अंदाजे ५३.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. या दिवशी चित्रपटाचे देशभरात २४,०४२ शो आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये हिंदी आवृत्तीचा सर्वाधिक वाटा असून, हिंदी भाषेत चित्रपटाने आठव्या दिवशी तब्बल ४३ कोटी रुपयांची कमाई केली. तर कन्नड आवृत्तीने ३.२५ कोटी, मल्याळम आवृत्तीने २.८० कोटी, तेलुगू आवृत्तीने २.३० कोटी आणि तमिळ आवृत्तीने २.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आठ दिवसांच्या एकूण कमाईचा विचार केला, तर भारतातील चित्रपटाची नेट कमाई ५६४.६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन ६७५.०५ कोटी रुपये झाले आहे.
दुसरीकडे, परदेशातील बाजारपेठांमधून चित्रपटाने आतापर्यंत अंदाजे ३५८.५० कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे भारत आणि परदेशातील कमाई मिळून चित्रपटाचे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन १,०३३.५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
‘धुरंधर २’ आणि ‘पुष्पा २’ च्या यादीत रामायणची एंट्री :
‘रामायण’ने आठ दिवसांत १,००० कोटींचा टप्पा पार केल्यामुळे आता त्याची तुलना भारतीय सिनेसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांशी केली जात आहे. जगभरात १,००० कोटी रुपयांची कमाई करणारा हा ११ वा भारतीय चित्रपट ठरला आहे.
याआधी ‘पुष्पा २’ आणि रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ या चित्रपटांनी अवघ्या सात दिवसांत हा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. तर ‘रामायण’ला यासाठी आठ दिवस लागले आहेत. यामुळे रामायणने बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवून दिली आहे.






