दक्षिण आफ्रिकेमध्ये पुन्हा रामफोंसा अध्यक्ष; विरोधी डेमोक्रॅटिक अलायन्सबरोबर केली आघाडी

जोहान्सबर्ग : दक्षिण आप्रिकेचे अध्यक्ष म्हणून सिरील रामफोंसा यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली. मात्र यावेळी ते आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस या आपल्या एकाच पक्षाच्या सरकारने नेतृत्व करणार नसून आघाडी सरकारने नेतृत्व करणार आहेत. आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस पक्षाला निवडणुकांमध्ये बहुमत मिळू शकले नव्हते. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस हा पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीत पराभूत झाला होता. मात्र एएनसी आणि डेमोक्रॅटिक अलायन्स या दोन पक्षांनी आपापसातील वैर बाजूला ठेवून आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
निवडणुकीमध्ये एएनसी पक्षाला ४० टक्के तर डेमोक्रॅटिक अलायन्स पक्षाला २२ मते मिळाली आहेत. या आघाडी सरकारचे नेतृत्व रामफोंसा यांच्याकडेच असणार आहे. राजधानी जोहान्सबर्गमध्ये सरन्यायाधीश रेमंड झोंदो यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.देशात राष्ट्रीय ऐक्याचे सरकार स्थापन होते आहे. त्यामुळे देशवासियांना एकमेकांविरोधात उभे करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असे आवाहन रामफोंसा यांनी केले. एकमेकांमध्ये भेद निर्माण करणाऱ्यांचे आणि तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. कारण दक्षिण आफ्रिका दृढ निश्चयी आहे, असे रामफोंसा यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले.
पराभव झाला तरी सत्तेत…
नॅशनल युनिटी या आघाडी सरकारमध्ये रामफोंसा यांच्या एएनसी आणि डेमोक्रॅटिक अलायन्सबरोबर काही छोटे पक्ष देखील सहभागी आहेत. मात्र आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून आघाडी स्थापन केली असल्यामुळे निवडणुकीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची मते मिळालेले पक्ष या नॅशनल युनिटी सरकारमध्ये सामील झाले नाहीत.





