Ramakant Achrekar: शिवाजी पार्कमध्ये होणार सचिन तेंडुलकरच्या गुरूंचे स्मारक; मास्टर ब्लास्टर झाला आनंदी, म्हणाला….

Ramakant Achrekar | Shivaji Park | Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने बुधवारी (ता.२८) मंजुरी दिली व आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात शिवाजी पार्कच्या गेट ५ जवळ १.८ मीटर क्यूब स्ट्रक्चर उभारण्याची योजना आहे.
या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी बी. व्ही. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबकडे देण्यात आली आहे आणि त्यासाठी सरकारकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही. शिवाजी पार्क जिमखान्याचे सहाय्यक सचिव सुनील रामचंद्रन यांनी स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे.
जीआरनुसार, छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या (शिवाजी पार्क) गेट क्रमांक ५ येथे हा पुतळा उभारण्यात येणार असून त्याची उंची 6 फूट असेल. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा प्रस्ताव मांडला होता.
हे काम मार्गी लावण्याची जबाबदारी बीएमसी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. त्याला कायदेशीर अडचणींचा सामनाही करावा लागणार आहे. हे स्मारक उभारताना कोणतीही झाडे तोडली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना जीआरने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आनंदी झाला आहे. त्याने आपल्या भावना ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सचिन म्हणाला की, “‘आचरेकर सरांचा माझ्या आणि इतरांच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे.
View this post on Instagram
मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत आहे. त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले. शिवाजी पार्कवर कायम राहणे हीच त्यांची इच्छा असेल. आचरेकर सरांच्या कर्मभूमीवर पुतळा उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मी खूप आनंदी आहे.’, असं ट्वीट सचिन तेंडुलकर याने केलं आहे.
रमाकांत आचरेकर यांचे २ जानेवारी २०१९ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले, त्यांनी भारतासाठी खेळायला गेलेल्या १४ खेळाडूंचे मार्गदर्शन केले. रामनाथ पारकर, एकनाथ सोलकर, बलविंदरसिंग संधू, लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण आंब्रे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, समीर दिघे, संजय बांगर, पारस म्हांबरे, रमेश पोवार, अजित आगरकर आणि साईराज बहुतुले यांचा समावेश आहे.





