Ram Navami : सियावर रामचंद्र की जय.! नाशिकच्या काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्सव साजरा; दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी

Ram Navami 2025 | Nashik | Shree Kalaram Mandir : चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. याचे कारण असे की, या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या ‘प्रभू रामचंद्राचा’ जन्म झाला. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला.
रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायला जातो. या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते. आज सगळीकडे रामनवमीचा उत्सव पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा होत आहे. पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या गर्दीचा अंदाज बघता चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
गुढीपाडव्यापासून काळाराम मंदिरात चैत्रोत्सव सुरू आहे. श्री काळाराम मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केली आहे पहाटे झालेल्या काकडा आरती नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे.
आज बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा काळाराम मंदिरात पार पडणार असून यापूर्वी प्रभू श्रीरामा सह सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणे चढवली जात आहेत. तसेच शहरातील विविध भागांमधून वर्षानुवर्षांची परंपरा जपत राम दिंड्या दाखल होत आहे.





