Ram Navami 2026 : बाळा जो जो रे…! तुळशीबाग राम मंदिरात पाळणा हलला; अवघे मंदिर झाले राममय
Ram Navami 2026 : तुळशीबाग राम मंदिरात सलग २६५ व्या वर्षी श्रीराम नवमीचा उत्साह; दर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी.

Ram Navami 2026 – कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे… असे पाळण्याचे मंगल स्वर पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग राम मंदिरात निनादले. मंदिरात श्रीरामजन्म सोहळ्यात झालेली फुलांची उधळण…रांगोळीच्या पायघड्या आणि गुरुवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पाळणा हलताच श्रीराम नामाच्या जयघोषात वातावरण राममय झाले.
श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग राममंदिरात श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. उत्सवाचे यंदा २६५ वे वर्ष आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले तसेच विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आणि कोटेश्वर तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले परिवाराने या उत्सवाचे आयोजन केले.
विविध श्रीराम मंदिरात सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. मंदिर परिसरात सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा झाला. श्रीराम जन्मानंतर मिळणारा श्रीरामाच्या वस्त्राचा ‘पागोट्याचा प्रसाद’ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तर, सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली.





