राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांचा आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्याकडून सत्कार

नेवासा – प्रख्यात ज्येष्ठ सरकारी वकील आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त कायदेतज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी त्यांची अहिल्यानगर येथे सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला.
या प्रसंगी आमदार लंघे-पाटील यांच्यासमवेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते संभाजीराव दहातोंडे आणि पांडुरंग दातीर उपस्थित होते. ॲड. उज्ज्वल निकम यांचा सत्कार आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार लंघे-पाटील म्हणाले, “ॲड. उज्ज्वल निकम यांच्या कायदेविषयक प्रगाढ ज्ञानाचा देशाला निश्चितच लाभ होईल. त्यांची राज्यसभेवरील निवड ही अभिमानास्पद बाब आहे.” त्यांनी ॲड. निकम यांचे अभिनंदन करून त्यांना तीर्थक्षेत्र नेवासा भेटीसाठी तालुक्यात येण्याचे निमंत्रणही दिले. ॲड. उज्ज्वल निकम यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत आपल्या नव्या जबाबदारीद्वारे देशसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.


