वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या : आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांची विधानसभेत मागणी

नेवासा : नेवासा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मे २०२५ मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तातडीने भरपाई मिळावी, अशी जोरदार मागणी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली. पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडत त्यांनी सभागृहाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले.
या नैसर्गिक आपत्तीत नेवासा तालुक्यातील कांदा, केळी, सोयाबीन, बाजरी या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधारच संकटात सापडला आहे, असे त्यांनी नमूद केले.
लंघे-पाटील म्हणाले, “नेवासा तालुका हा पूर्णपणे ग्रामीण भाग असून सुमारे ८० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अचानक आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरसकट आणि तात्काळ मदत जाहीर करावी.”
यावेळी त्यांनी विधानसभेच्या सभापतींचे विशेष लक्ष वेधत, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या भरपाईच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.





