Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी शिवसेनेची (शिंदे गट) एक जागा असेल, आणि त्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेतील पराभवानंतर पुनरागमनाची संधी? (Rajya Sabha Election 2026) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याची त्यांची संधी हुकली. महायुतीकडून उमेदवारी देण्यात झालेल्या विलंबामुळे त्यांना फटका बसल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जाते. मात्र दोन टर्म संसदेत काम केल्याचा अनुभव पाठीशी असल्याने त्यांच्या नावाला राज्यसभेसाठी प्राधान्य दिले जात असल्याची माहिती आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनुभवी चेहरा हवा Rajya Sabha Election 2026: २०२७ च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिंदे गटाचे अस्तित्व मजबूत राखण्यासाठी अनुभवी नेतृत्व राज्यसभेत असावे, अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची भावना असल्याचे बोलले जात आहे. नाशिक महापालिकेत भाजपची तर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत शिंदे गटाची सत्ता असल्याने या दोन्ही ठिकाणी समन्वय राखण्यासाठी अनुभवी खासदार आवश्यक असल्याचे मानले जात आहे. हेही वाचा – भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाचं काय? गोडसे यांची सावध भूमिका – या चर्चांबाबत हेमंत गोडसे यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. “अद्याप पक्षाकडून कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही. मुख्य नेते एकनाथ शिंदे जे ठरवतील, तोच अंतिम निर्णय असेल,” असे त्यांनी सांगितले. कोण आहेत हेमंत गोडसे? ३ ऑगस्ट १९७० रोजी जन्मलेले हेमंत गोडसे नाशिक तालुक्यातील संसरी गावचे रहिवासी असून त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा जुना आहे. १९९६ मध्ये याच कुटुंबातील राजाभाऊ गोडसे शिवसेनेचे खासदार झाले होते. व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेले हेमंत गोडसे बांधकाम क्षेत्रातही कार्यरत आहेत. २००७ ते २०१२ दरम्यान ते जिल्हा परिषद सदस्य होते. २००९ मध्ये त्यांनी मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली, त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. नंतर शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ मध्ये छगन भुजबळ आणि २०१९ मध्ये समीर भुजबळ यांचा पराभव करत ते सलग दोनवेळा खासदार झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर साथ देणाऱ्या १३ खासदारांमध्ये त्यांचाही समावेश होता. आता शिंदे गटाच्या कोट्यातील राज्यसभेची जागा हेमंत गोडसे यांना मिळणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.