Raju Shetty : ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक ठप्प
Raju Shetty : राजू शेट्टी यांचा शहरांकडे जाणारा भाजीपाला आणि दूध देखील रोखण्याचा इशारा

Raju Shetty : ऊसदराच्या मागणीसाठी कोल्हापुरातील किणी टोलनाक्यावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन 22 तासांहून अधिक काळ उलटूनही सुरूच आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मंगळवारी रात्री पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाका परिसरात रस्त्यावरच झोपले होते.
ऊसाला 4500 रुपयांचा दर मिळावा यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
‘तुम्ही आमची दिवाळी होऊ दिली नाही, तर तुमचीही दिवाळी होऊ देणार नाही, असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे.
तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून, आज दुपारपासून दूध आणि भाजीपाला वाहतूक रोखण्यात येणार आहे. तसेच गावागावांतून होणारी ऊस वाहतूकही बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ऊसाला 4 हजार 500 रुपये दर मिळावा
ऊसाला 4 हजार 500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सकाळपासून पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग गेल्या दहा तासांपेक्षा अधिक काळ रोखून धरला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.
राजू शेट्टी यांच्या ऊस दराच्या आंदोलनाचे परिणाम पुणे-बंगळुरु महामार्गावर दिसायला लागले आहेत. गेल्या 22 तासांपासून पुणे बेंगलुरु महामार्ग बंद ठेवला आहे. त्यामुळे किनी टोल नाक्यापासून अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
गैरसोयमुळे ट्रक चालकांचेही आंदोलन सुरु
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे गैरसोय झालेल्या ट्रक चालकांनीही आता याठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. सध्या या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यासोबतच राजू शेट्टी यांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला आणि दूध देखील रोखण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा:





