Raju Shetti : साखरेचा हमीभाव वाढवेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींनी घेतली आक्रमक भूमिका
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे.

Raju Shetti : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन काल स्थगित केल्यानंतर आज राजू शेट्टी यांनी आपला मोर्चा थेट सांगली आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे वळवला.
दिवसभरात त्यांनी अनेक प्रमुख साखर कारखान्यांना थेट धडक देत ‘काटा बंद’ आंदोलन पुकारले. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे. राजू शेट्टींच्या (Raju Shetti) या आक्रमक पवित्र्यापुढे सर्वच कारखान्यांनी आपले कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगली जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्यांना लक्ष्य केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यांच्या वजन काट्यावर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांसह धडक मारत, जोपर्यंत केंद्र सरकार साखरेचा हमीभाव वाढवत नाही, तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही आणि सर्व कारखाने बंद ठेवणार, असा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
कारखानदारांना आणि प्रशासनाला इशारा देताना राजू शेट्टी म्हणाले, “चालू वर्षी शेतकरी केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांविरोधात रस्त्यावरची आरपारची लढाई लढत आहे. साखरेचा हमीभाव वाढला, तर या लढाईत शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा खुद्द कारखानदारांचाच होणार आहे. त्यामुळे सर्व कारखानदारांनी कोणत्याही राजकीय किंवा शासकीय दबावाला बळी न पडता या आंदोलनाला जाहीर सहकार्य करावे.
जर कोणी कारखाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, तर होणाऱ्या तीव्र नुकसानीची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वी कारखान्यांची असेल!” स्वाभिमानीच्या ‘काटा बंद’ आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन आधीच सतर्क झाले होते. सर्वच साखर कारखान्यांच्या परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मात्र, शेतकऱ्यांचा वाढता संताप आणि राजू शेट्टी यांच्या आक्रमक भूमिकेपुढे पोलिसांचा फौजफाटा असूनही कारखाने बंद पाडण्यात ‘स्वाभिमानी’ला पूर्ण यश आले आहे. केंद्र सरकार आता या शेतकरी आंदोलनापुढे नमते घेणार का आणि साखरेचा हमीभाव वाढवणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी कृष्णचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, उपाध्यक्ष जी. डी. मोरे, स्वाभिमानी शेतकरी सघटनेचे भागवत जाधव, विश्वास कोळी, देवानंद पाटील, संजय बेले, बापूसाहेब साळुंखे, बाबासाहेब साद्रे, संदीप राजोबा शहाजी पाटील, रविकिरण माने, प्रदीप नागरे, आकाश साळुंखेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्यने (Raju Shetti) उपस्थित होते.






