Raju Shetti: “६५० रुपयांत चालकाच्या हातात फक्त २५०!” पुणे विमानतळावर लूट? राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Raju Shetti: कंत्राटांमध्ये बड्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हप्ते; विमानतळ प्राधिकरणाच्या संगनमताने दररोज हजारो प्रवाशांची लूट सुरू असल्याचा दावा.

Raju Shetti – लोहगाव विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाच्या संगनमताने प्रवासी. टॅक्सी चालकांची दररोज लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मतदारसंघातच खासगी कंत्राटदारांमार्फत ही राजरोस लूट सुरू असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.
सोशल मीडियावर स्वतःचा अनुभव शेअर करताना राजू शेट्टी म्हणतात की, दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहासाठी टॅक्सी बुक केली. ऑनलाईन ॲपवर मूळ भाडे ३५० ते ३७५ दिसत असताना, विमानतळाच्या मुख्य गेटवरून पिक-अप घेण्यासाठी त्यांच्याकडून तब्बल ६५० वसूल करण्यात आले. केवळ गेटवरून प्रवाशांना घेण्यासाठी टॅक्सी चालकांकडून २७५ अतिरिक्त टर्मिनल शुल्क आकारले जात आहे.
हे अतिरिक्त शुल्क टाळायचे असल्यास प्रवाशांना जड बॅगा, लहान मुले आणि वृद्धांसह ६०० मीटर अंतरावरील एरोमॉलपर्यंत चालत जाण्याची सक्ती केली जाते. विमानतळावरून दररोज ५ ते ७ हजार वाहने प्रवाशांना पिक-अप करतात. या कंत्राटांमध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे हप्ते सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शेट्टी यांनी केला.
पुणे विमानतळावर ६५० रुपयांच्या टॅक्सी भाड्यामध्ये चालकांचे शोषण होत असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. या एकूण भाड्यातून २७५ रुपये थेट विमानतळ प्राधिकरणाकडे टर्मिनल शुल्क म्हणून जातात. उर्वरित ३७५ रुपयांमधून ओला-उबरसारख्या कंपन्या २५ ते ३० टक्के (१०० ते १२५ रुपये) कमिशन कापतात. त्यामुळे प्रत्यक्षात राबणाऱ्या चालकाच्या हातात अवघे २५० ते २७५ रुपये पडतात. यातून ८० ते १०० रुपयांचे इंधन, गाडीचा हप्ता, व्याज आणि मेंटेनन्स वजा जाता चालकाकडे काहीच उरत नाही.





