Panchganga Sugar Factory : “काट्यावर संशय असेल तर…; पंचगंगा कारखान्याचे शेतकऱ्यांना थेट आव्हान
वर्षभर काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून पिकवलेल्या उसाच्या एका एका कांडीचा हिशोब मिळावा, ही शेतकऱ्याची रास्त अपेक्षा नेहमीच काट्यावरील संशयाच्या धुरळ्यात (Panchganga Sugar Factory) अडकून पडायची.

Panchganga Sugar Factory : “आमच्या काट्यावर काडीमात्र संशय असेल, तर खुशाल बाहेर कुठेही वजन करून पावती घेऊन या; आमच्या काट्यावर एक ग्रॅमचाही फरक निघाला तर शेतकरी देईल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत!” पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे (Panchganga Sugar Factory) मार्गदर्शक प्रभाकर शिंदे यांनी भरसभेत फेकलेले हे थेट आव्हान सध्या संपूर्ण नेवासा तालुक्यातील ऊस पट्ट्यात वाऱ्यासारखे पसरले असून कारखानदारांच्या वर्तुळात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
आजवर ज्या विषयाला हात लावायची कोणी हिंमत करत नव्हतं, त्याच ‘वजन काटा’ नावाच्या गूढ चक्रव्यूहावर थेट घाव घालण्यात आल्याने शेतकरी वर्गात आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गेल्या काही काळापासून शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाशी आणि दुष्काळाशी दोन हात करत कसातरी ऊस जगवतो आहे. खते, मशागत आणि मजुरीचा वाढलेला खर्च यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असताना, कारखान्यांच्या वजन काट्यावर उसाची परस्पर चोरी होते या संशयाने बळीराजा वर्षानुवर्षे धास्तावलेला आहे.
वर्षभर काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून पिकवलेल्या उसाच्या एका एका कांडीचा हिशोब मिळावा, ही शेतकऱ्याची रास्त अपेक्षा नेहमीच काट्यावरील संशयाच्या धुरळ्यात (Panchganga Sugar Factory) अडकून पडायची. साखर उद्योगाच्या इतिहासात वजन काटा ही नेहमीच एक गूढ आणि संशयास्पद ‘ब्लॅक बॉक्स’ प्रणाली मानली गेली, जिथे शेतकऱ्याला शंका उपस्थित करण्याचा साधा अधिकारही उरला नव्हता.
नेमक्या याच नाजूक नसेवर बोट ठेवत पंचगंगा कारखान्याने ‘वजन पडताळणीची खुली मुभा’ जाहीर करून साखर उद्योगातील वर्षानुवर्षांच्या अलिखित नियमांना सुरुंग लावला आहे. “आम्ही केवळ उसावर नाही, तर शेतकऱ्याच्या अथांग विश्वासावर कारखाना चालवतो,” असा दावा करत व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना थेट बाहेरच्या अधिकृत काट्यावर ट्रॅक्टर तोलून आणण्याचे आणि कारखान्याच्या काट्याशी ताडून पाहण्याचे अभूतपूर्व स्वातंत्र्य दिले आहे. या एकाच निर्णयाने आता साखर पट्ट्यातील राजकीय आणि व्यावसायिक गणिते पुरती उलथापालथ झाली आहेत.
पंचगंगाच्या (Panchganga Sugar Factory) या धाडसी पवित्र्यानंतर आता संशयाची सुई तालुक्यातील इतर बड्या कारखान्यांकडे वळली आहे. “पंचगंगा जर छातीठोकपणे आव्हान देऊ शकते, तर मग इतर प्रस्थापित कारखान्यांना शेतकऱ्यांना बाहेर वजन तपासण्याची मुभा द्यायला नेमकी कसली भीती वाटते? एकदाचे दूध का दूध अन् पाणी का पाणी होऊच द्या!” असा संतप्त सवाल आता उसाच्या फडातून दबक्या आवाजात नव्हे, तर उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.
पंचगंगा कारखान्याने (Panchganga Sugar Factory) घेतलेली ही आक्रमक आणि पारदर्शक भूमिका साखर उद्योगातील काटा मारण्याच्या दहशतीला कायमचा सुरुंग लावून क्रांती घडवणार, की हा केवळ चालू गाळप हंगामापुरता मर्यादित असलेला प्रसिद्धीचा स्टंट ठरणार, या गूढ प्रश्नाचे उत्तर आता येणारा गाळप हंगामच देणार आहे.






