Radha Yadav : राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणामुळे अडचणीत; बॅालीवूडकर मदतीसाठी सरसावले, पत्नी राधा यादव म्हणाल्या…
Radha Yadav : चेक बाऊन्स प्रकरणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अभिनेता राजपाल यादवची पत्नी राधा यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Radha Yadav : बॅालीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav)चेक बॅाऊन्स प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला आत्मसर्मपण करण्याची तंबी दिल्यानंतर अखेर तिहार तुरुंगात अभिनेत्याने आत्मसर्मपण केले. मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या राजपाल यादवला आता बॅालीवूड कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अशातच त्याची पत्नी राधा यादव यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बॅालीवूड इंडस्ट्रीने दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल राधा यादव (Radha Yadav) यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. “सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलाय. इंडस्ट्रीनं खूप पाठिंबा दिलाय. मदतीसाठी पुढे येणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार…” अशी प्रतिक्रिया राधा यादव यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. तिहार तुरुंगात राजपाल यादवने आत्मसमर्पण केलं, तेव्हा राधा यादवचे हे वक्तव्य समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
चेक बॅाऊन्स हे प्रकरण २०१० चे आहे. अभिनेता राजपाल यादव याने ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ५ कोटींचे कर्ज घेतले होते. हा चित्रपट फ्लॅाप ठरला आणि अभिनेता वेळेवर कर्ज फेडू शकला नाही. परिणामी कर्जावरील व्याजाची रक्कम वाढतच गेली. ती तब्बल ९ कोटी इतकी झाली. राजपाल यादवने कंपनीला दिलेले चेक बाउन्स झाले. त्यानंतर कंपनीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
त्यानंतर चेक बाऊन्स प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेले. राजपाल यादव (Radha Yadav) याने कोर्टात आपल्याला एका आठवड्याची मुदतवाढ मिळावी यासाठी विनंती केली होती. पण त्याची विनंती कोर्टाने फेटाळून लावली आणि त्याला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तिहार तुरुंगात जात राजपाल यादव याने आत्मसर्मपण केले.
बॅालीवूडकरांकडून मतदाचा हात
राजपाल यादव मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचे समोर आल्यानंतर सर्वात प्रथम अभिनेता सोनू सूदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टमध्ये राजपाल यादवला पाठिंबा जाहीर केला. अभिनेत्याची थकबाकी फेडण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अजय देवगण, सलमान खान, डेव्हिड धवन, वरुण धवन यासारख्या अनेक कलाकारांनी राजपालला आर्थिक मदत केली. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी राजपाल यादवला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे.






