Rajnath Singh : एअरो इंडिया २०२५ चे राजनाथ सिंह करणार उद्घाटन

नवी दिल्ली : आशियातील सर्वात मोठे एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन असलेल्या एअरो इंडियाच्या १५ व्या आवृत्तीचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्या केले जाणार आहे. कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलहंका हवाई दलाच्या तळावर हे प्रदर्शन होणार आहे. द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज या व्यापक संकल्पनेवर आधारित, या पाच दिवसांच्या प्रदर्शनात जागतिक एरोस्पेस कंपन्यांच्या अत्याधुनिक उत्पादनांसह भारताचे हवाई सामर्थ्य आणि स्वदेशी अत्याधुनिक नवोन्मेष प्रदर्शित केले जातील.
यामध्ये ९० पेक्षा अधिक देशांमधील १५० परदेशी कंपन्यांचा समावेश असून हे आतापर्यंतचे सर्वात मोठे एरो इंडिया प्रदर्शन ठरणार आहे. सुमारे ३० देशांचे संरक्षण मंत्री – प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय ४३ देशांच्या वायू दल प्रमुख आणि सचिवांची उपस्थिती देखील यावेळी असणार आहे.
संरक्षण उत्पादनाने विक्रमी १.२७ लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला असून वर्ष २०२५-२६ अखेरीस हे उत्पादन १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल. संरक्षण निर्यात २१ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून, ती ३० हजार कोटी रुपयांहून अधिक जाईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करण्याच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





