Rajnath Singh : खर्गेंचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी.! “देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या” – राजनाथ सिंह
या विधानामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत, त्यांनी काँग्रेसच्या राजकीय आणि वैचारिक अधोगतीवरही प्रश्न उपस्थित केले.

Rajnath Singh – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले विधान ‘अत्यंत दुर्दैवी’ असल्याची टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केली. या विधानामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत, त्यांनी काँग्रेसच्या राजकीय आणि वैचारिक अधोगतीवरही प्रश्न उपस्थित केले.
बिहारची राजधानी पाटणा येथे माजी मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिंह यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खर्गे भाषण करत होते. त्या वेळी एका उपस्थित व्यक्तीने पंतप्रधान कुठेही जाणार नाहीत, असे म्हटले. त्यावर प्रतिक्रिया देताना खर्गे यांनी ‘मोदी का बाप भी जाएगा’ असे विधान केले. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.
या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता, राजनाथ सिंह यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. काँग्रेस अध्यक्षांसारख्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीकडून सार्वजनिक जीवनात अधिक गांभीर्य, संयम, प्रतिष्ठा आणि जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच अशा प्रकारची भाषा वापरणे त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला साजेसे नसून काँग्रेसच्या राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत आहे. खर्गे यांच्या विधानातून काँग्रेसची केवळ राजकीयच नव्हे, तर वैचारिक अधोगतीही दिसून येते, असे सिंह म्हणाले.
लोकशाहीमध्ये जनता प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवते आणि योग्य वेळी त्याचे प्रत्युत्तर देते, असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला. खर्गे यांच्या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे.





