Rajnath Singh : आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरले ऑपरेशन सिंदूर – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरवत स्वदेशी शस्त्रास्त्रांच्या जोरावर शौर्य गाजविले. संरक्षण क्षेत्राने मोठी झेप घेतली असून, गेल्या दहा वर्षांत संरक्षण साहित्य निर्मिती ४६ हजार कोटी रुपयांवरून तब्बल १.५० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये खासगी क्षेत्राचे सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचे योगदान असून, २०२९ पर्यंत ही क्षमता ३ लाख कोटी रुपयांपर्यंत नेऊन ५० लाख कोटी रुपयांचे संरक्षण साहित्य निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले.
सिम्बायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी देशाच्या संरक्षण व कौशल्य विकास क्षेत्रातील प्रगतीचे चित्र मांडले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार, संजीवनी मुजुमदार व डॉ. विद्या येरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संरक्षण तंत्रज्ञानाचे हब बनवणार – मुख्यमंत्री
राज्य शासनाकडून महाराष्ट्राला संरक्षण तंत्रज्ञानाचे केंद्र (हब) बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देश संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात असताना, महाराष्ट्रानेही या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगामी काळात गुंतवणूक, उत्पादन व मनुष्यबळ निर्मितीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर काम होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पालकांची नाराजी..
किवळे येथील सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात पालकांनी एकच गोंधळ घातला. या समारंभाच्या ठिकाणी प्रवेश न मिळाल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. विद्यापीठ प्रशासनाकडून पालकांना योग्य त्या सूचना योग्य वेळेत न दिल्याने हा गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समांरभात प्रवेश न मिळाल्याने पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.





