Rajgurunagar : टोरंट कंपनी हटाव, भीमाशंकर बचाव’ घोषणांनी राजगुरुनगर दणाणले
Rajgurunagar : राजगुरुनगर बसस्थानकाजवळील हुतात्मा स्मृतिशिल्प येथे मोर्चाची सुरुवात झाली.

राजगुरुनगर : भीमाशंकर अभयारण्यातील टोरंट विद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेली वृक्षतोड तातडीने थांबवावी आणि प्रस्तावित प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी ‘आम्ही राजगुरुनगरकर’ यांच्या वतीने शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात शहरातील महिला, पुरुष आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अभयारण्यातील वनसंपदा आणि जैवविविधता वाचविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
राजगुरुनगर बसस्थानकाजवळील हुतात्मा स्मृतिशिल्प येथे मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर हा मोर्चा राजगुरुनगर बाजारपेठ, हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक मार्गे राजगुरुनगर नगरपरिषद आणि तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला.
‘वृक्ष वाचवा, जंगल बचाव’, ‘टोरंट कंपनी हटाव, भीमाशंकर बचाव’, ‘जंगल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणांनी संपूर्ण राजगुरुनगर शहर दणाणून गेले. अभयारण्यातील वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पर्यावरण संवर्धनासाठी एकजुटीने आवाज उठविला.





