Rajgurunagar : वायरमननी संघटित होऊन ग्राहकांना सेवा द्यावी – आमदार काळे
Rajgurunagar : आमदार बाबाजी काळे म्हणाले की, खेड तालुक्यातील सर्व वायरमन एकत्र येऊन संघटित झाले, ही चांगली बाब आहे.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील वायरमन कर्मचाऱ्यांना संघटित करून त्यांच्यात समन्वय वाढविण्यासह ग्राहकांना दर्जेदार विद्युत सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या खेड तालुका वायरमन असोसिएशनचे उद्घाटन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. वायरमन बांधवांनी एकजुटीने काम करून, ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार काळे यांनी यावेळी केले.
आमदार बाबाजी काळे म्हणाले की, खेड तालुक्यातील सर्व वायरमन एकत्र येऊन संघटित झाले, ही चांगली बाब आहे. अनेक वायरमन प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आले आहेत. संकटाच्या काळात संघटनेतील सदस्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. एकजुटीने निर्णय घेऊन ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर भर द्यावा. खेड तालुका देशाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान असलेला तालुका असून, येथे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. विविध व्यवसायांना चालना मिळत असून, वायरमन व्यवसायालाही तालुक्यात मोठा वाव आहे. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने संघटनेने काम करावे. संघटनेच्या कार्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला राजगुरुनगरचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मुकुंद आवटे, ॲड. वैभव कर्वे, डॉ. शिवाजीराव गायकवाड, भाऊ भालेकर आणि पुणे जिल्हा विद्युत संनियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड खेड तालुका वायरमन असोसिएशनचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब गारगोटे, सचिव मयूर गोडसे, पांडुरंग उढाणे, श्रीकांत दिवेकर, राजू हिंगे, वसंत शिंदे, अनिल थिगळे, प्रवीण सांडभोर आणि सागर कोहिनकर यांच्यासह खेड तालुक्यातील मोठ्या संख्येने वायरमन कर्मचारी उपस्थित होते.
असोसिएशनच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ
खेड तालुका वायरमन असोसिएशनच्या स्थापनेमुळे तालुक्यातील वायरमनना एकत्र येण्यासाठी, परस्परांमधील समन्वय वाढविण्यासाठी आणि व्यावसायिक अडचणी सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून वायरमनच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासोबतच ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार विद्युत सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मुकुंद आवटे, ॲड. वैभव कर्वे, डॉ. शिवाजीराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.





