Rajgurunagar News : बैलगाडा शर्यत आंदोलनाचा मोठा निकाल! ‘त्या’ रास्तारोकोतील सर्व नेत्यांची निर्दोष मुक्तता
Rajgurunagar News : २०१७ मधील चाकण रास्तारोको आंदोलनाचा राजगुरुनगर न्यायालयात निकाल; सबळ पुराव्याअभावी सर्वपक्षीय नेत्यांची निर्दोष सुटका.

Rajgurunagar News – बैलगाडा शर्यत बंदी उठवावी या मागणीसाठी चाकण येथे पुणे-नाशिक महामार्ग रस्तारोको आंदोलन करणार्या सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच बैलगाडा चालक-मालकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राजगुरुनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ज्योतीमाला सी. गुप्ता यांनी नुकताच हा निकाल दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 28 ऑक्टोबर 2017 रोजी पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना बैलगाडा शर्यत बंदीच्या निषेधार्थ चाकण येथील तळेगाव चौकात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, बैलगाडा चालक-मालक व शौकिनांनी रस्तारोको आंदोलन केले होते.
आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषणे झाल्याचा तसेच सुमारे तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.या प्रकरणी महेश आनंदराव शेवकरी यांच्यासह अनेक नेते-कार्यकर्त्यांवर चाकण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 143, 149, 341, 188 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार फिर्यादी होते, तर तपास पोलीस उपनिरीक्षक एन. जी. पतंगे यांनी केला.हा खटला राजगुरुनगर न्यायालयात चालला. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता के. डी. सोनवणे यांनी आठ साक्षीदार तपासले. तर आरोपींच्या बाजूने अॅड. एच. एस. बगाटे, अॅड. जी. एम. होणराव,
अॅड. व्ही. जी. पोखरकर, अॅड. एस. ए. काजळे, अॅड. पी. एम. परदेशी, एस. डी. कोतवाल व आर. बी. टाकळकर यांनी युक्तिवाद मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुराव्यांचा सखोल विचार करून दि. 28 जानेवारी रोजी न्यायालयाने गुणदोषांवर निकाल देत या आंदोलनातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.




