Check Bounce Case : चेक बाऊन्स झाला अन्…; १३ वर्षांनंतर न्यायालयाने सुनावली तब्बल ‘एवढ्या’ लाखांचा दंड
Check Bounce Case : घोडनदी (शिरूर) येथील प्रसिद्ध व्यापारी हरकचंद खाबिया यांच्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने दिला मूळ रकमेच्या दुप्पट दंडाचा आदेश.

Check Bounce Case – घोडनदी (शिरुर) येथील न्यायालयाने तब्बल १३ वर्षे चाललेल्या चेक अनादर प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने आर्थिक व्यवहारात फसवणूक करणाऱ्या आरोपीस तब्बल ३८ लाखांचा दंड आणि सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या कडक निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, व्यापारी व व्यावसायिक वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घोडनदी येथील प्रसिद्ध व्यापारी हरकचंद माणिकलाल खाबिया यांनी सन २०१२ मध्ये आरोपी आरिफ गणी शेख यास व्यावसायिक कारणासाठी विश्वासाने १९ लाख रुपये हातउसने म्हणून दिले होते. या रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने फिर्यादीस १९ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र संबंधित धनादेश बँकेत जमा केल्यानंतर तो अनादरित झाला.
चेक बाऊन्स झाल्यानंतर फिर्यादीने कायदेशीर नोटीस देऊनही आरोपीकडून रक्कम न मिळाल्याने फिर्यादीतर्फे ॲड. भागवत दिघे यांनी ६ जुलै २०१३ रोजी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ अंतर्गत घोडनदी न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर प्रकरणात दीर्घकाळ सुनावणी सुरू राहिली. तब्बल १३ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर घोडनदी येथील न्यायाधीश दत्तात्रय बी. डोमाळे यांनी २३ मार्च २०२६ रोजी निकाल देत आरोपी आरिफ गणी शेख यास दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीस मूळ रकमेच्या दुप्पट म्हणजेच ३८ लाख रुपयांचा दंड ठोठावत, ती संपूर्ण रक्कम फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. तसेच आरोपीस सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या निकालामुळे व्यवहारात विश्वासघात करून चेक देणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला असून आर्थिक व्यवहार करताना कायदेशीर सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.




