Rajgurunagar News : राजगुरुनगरमध्ये आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात खेड तालुका भीमशक्ती संघटनेने थेट कारवाई करत अतिक्रमण जमीनदोस्त केल्याची घटना समोर आली आहे. जुन्या पुणे-नाशिक महामार्गालगत भीमा नदी पुलाजवळ चांडोली गावाच्या हद्दीत असलेल्या या दफनभूमीवर काही व्यक्तींनी सिमेंट वस्तू कारखाना आणि बांबू विक्रीच्या नावाखाली बेकायदेशीर अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. (Rajgurunagar News) विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१२ साली देखील एका प्रभावशाली व्यक्तीने ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील व भीमशक्ती संघटना खेड यांच्या आंदोलनामुळे ही जागा मुक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा एकदा अतिक्रमण झाल्याचा आरोप होत आहे. प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आक्रमक भूमिका घेत थेट अतिक्रमण हटवले. या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Rajgurunagar News) “२०२२ पासून आम्ही या जागेचा पाठपुरावा करत आहोत, परंतु शासनाने आम्हाला दाद दिली नाही. लोकशाही मार्गाने मिळालेले अधिकार प्रशासनाकडून मिळत नसल्याने, आम्हाला आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.” – विजय डोळस, अध्यक्ष भीमशक्ती संघटना (पुणे जिल्हा)