Pune District : ग्रीन वर्ल्ड को-प्राइड पुरस्काराने राजगुरूनगर बँकेचा गौरव

राजगुरूनगर : सहकार क्षेत्रात अग्रणी ठरलेल्या राजगुरूनगर सहकारी बँक लिमिटेडने आदर्श, सक्षम व पारदर्शक कार्यपद्धती राबवत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल जागतिक सहकार वर्षानिमित्त ग्रीन वर्ल्ड को-प्राइड 2025 या प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
सभासद हितसंवर्धनाला केंद्रस्थानी ठेवून केलेले सक्षम आर्थिक व्यवस्थापन, पारदर्शक व्यवहार, कर्ज पोर्टफोलिओचे सुयोग्य नियोजन तसेच व्यवसाय व उत्पन्नवाढीस दिलेले महत्त्वपूर्ण योगदान याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या सहकार सभागृहात आयोजित समारंभात सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रकाश डोळस व मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी स्वीकारला.
या पुरस्कार सोहळ्यानिमित्त ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मंथन 2025 या भव्य सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सहकार क्षेत्रातील बँकिंग, साखर उद्योग, पतसंस्था, कृषी तसेच विविध सहकारी क्षेत्रांपुढील आव्हाने व संधी यांवर सखोल चर्चा झाली. या परिषदेत राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे, कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड. कोकरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, कॉसमॉस सहकारी बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष मिलिंद काळे तसेच ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी मार्गदर्शन केले.
राजगुरूनगर सहकारी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिस्तबद्ध आर्थिक धोरण, जोखीम व्यवस्थापन व सभासदाभिमुख सेवा यामुळे सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या पुरस्कारामुळे बँकेच्या अधिकारी, कर्मचारी व सभासदांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यात आणखी प्रभावी व लोकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प बँकेने व्यक्त केला आहे.





