Rajgad Politics : जिल्हा परिषदेसाठी नातू, तर पंचायत समितीसाठी आजी; एकाच घरातून उमेदवारीची चर्चा

प्रभात वृत्तसेवा
विंझर ( समीर कांबळे ) – आगामी जिल्हा परिषद आणि राजगड पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजगड तालुक्यात जोरदार तयारी सुरू झाली असून राज्यात व केंद्रात सत्ताधारी भाजप असलेल्या पक्षाकडून इच्छूकांची भाऊगर्दी वाढली आहे. तर, परंपरागत काॅंग्रेस वगळता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गटांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी यादी आहे. या सर्वात वर पोळेकर कुटुंबातील आजी आणि नातवाचे नाव आहे.
गेली ८-९ वर्षे राजगड (वेल्हा) तालुक्यात, विशेषतः पानशेत, वरसगाव आणि गुंजवणी धरणभागात आपल्या सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ समाजकार्यातून जनमानसात स्थान मिळवलेले भाजपचे युवा नेते अजिंक्य दत्तात्रय पोळेकर आता सक्रिय राजकारणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या विंझर-पानशेत गटातून उमेदवारीसाठी त्यांचे नाव भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत अग्रस्थानी चर्चेत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या आजी आणि माणगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच फुलाबाई मारुती पोळेकर (निवंगुने) ह्या देखील पंचायत समितीसाठी पानशेत गणातून इच्छुक उमेदवार आहेत.
अजिंक्य पोळेकर हे भाजप राजगड तालुक्याचे सक्रिय सदस्य आहेत आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या विंझर-पानशेत गटातून उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर, त्यांची आजी आणि माजी सरपंच फुलाबाई पोळेकर या पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्याची इच्छा पोळेकर यांनी व्यक्त केल्याने, हा गट आता चर्चेत आला आहे. भाजपच्या २६ इच्छुकांच्या नावानंतर या दोन तगड्या उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. राजगड (वेल्हा) तालुक्यातून ‘पोळेकर’ नावाच्या चर्चेमुळे विंझर-पानशेत गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची करणार हे निश्चित!
सामाजिक कार्याचा धडाका..
कोविडच्या कठीण काळात त्यांनी अडचणीत सापडलेल्या ग्रामस्थांना भाजी वाटप केले. गरजू नागरिकांना रुग्णालयात दाखल करून घेतले आणि मदतीचा हात दिला. ‘अल्बम 30′ सारख्या उपक्रमातून त्यांनी अनेक तरुणांना सामाजिक कामात जोडले. तालुक्यातील वाड्यावस्त्यांवरील वीज, पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांची सोय केली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवले. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांना मुलांना खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. ’पोळेकर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य’ च्या माध्यमातून ते आपले सामाजिक कार्य आजही अविरतपणे चालू ठेवले आहे.





