Pune Gramin : शिवरे गावात राजगड पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांचा अवैध गुटखा जप्त

भोर : भोर तालुक्यातील शिवरे गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राजगड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६१ लाख २७ हजार ८४० रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. तसेच ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
राजगड पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली होती की, शिवरे गावाजवळील राजस्थानी ढाबा येथे अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला असता. सदर ठिकाणी एम.एच. ०४ जे.यू. ११३९ क्रमांकाचा ट्रक उभा होता. ट्रक चालकाची विचारपूस केली असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र ट्रक मधून गुटख्यासारखा उग्र वास येत असल्याचे दिसून आले.
यानंतर ट्रक पोलिस स्टेशनमध्ये आणून पंचासमक्ष तपासला असता, ट्रक मधून राजनीगंध पान मसाला आणि तुलशी या गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. या मालाची एकूण किंमत ६१ लाख २७ हजार ८४० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात अश्वनी कुमार त्रिपाठी (रा. मुंबई, मुळ रा. उत्तर प्रदेश) या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर विभाग, सासवड) राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत.





