प्रभात वृत्तसेवा नसरापूर – भोर तालुक्यातील पारवडी गावातील अलका किसन लिमण या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळपासून त्या बेपत्ता असल्याने नातेवाईक व गावकरी यांनी शोधमोहीम सुरू केली होती. शोध लागल्यावर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावण्यात आले. खबर देणारे लहु बापुराव लिमण (वय 35) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे चुलत भाऊ तसेच गावातील काही व्यक्ती यांनी शेतात फिरून शोध घेत असताना जमीन गट क्रमांक 163 मधील दत्तात्रय हरीभाऊ लिमण यांच्या विहिरीत महिलेसंबंधी हालचाल दिसली. तत्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापनाला कळवून मदत मागवण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विहिरीत उतरून शोधमोहीम राबवली.रेस्क्यूदरम्यान अलका लिमण यांचा मृतदेह विहिरीत आढळला. गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरगे, संतोष भगत, योगेश गोपी आणि प्रतीक महामुनी यांनी मिळून मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य पूर्ण केले.त्यानंतर मृतदेह अॅम्ब्युलन्सच्या मदतीने सिद्धीविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे नेण्यात आला. डाॅक्टरांनी तपासून अलका लिमण या 12.38 वाजण्यापूर्वीच मृत झाल्याची खात्री दिली. या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. खबर देणाऱ्यांनी या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे पोलिसांना कळवले आहे. पो. हवा. मुंढे यांनी नोंद घेतली असून तपास सपोफौ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. गवळी यांनी पुढील प्रक्रिया पाहिली.