राजगड पोलिसांकडून ५.४८ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

नसरापूर, : राजगड पोलीस स्टेशनने नागरिकांचा हरवलेला ५,४८,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल शोधून मूळ मालकांना परत केला आहे. यामध्ये ५६ मोबाईल फोन (किंमत ४,४८,००० रुपये) आणि एक सोन्याची अंगठी (किंमत १,००,००० रुपये) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या तत्परतेने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत कंपन्या, पर्यटन आणि धार्मिक स्थळांमुळे नेहमीच वर्दळ असते. याचाच फायदा घेऊन अनेकदा मोबाईल आणि दागिने हरवतात. अशाच एका घटनेत सनत सुहास मोहरीर (वय २९, रा. महाळुंगे, पुणे) यांची बनेश्वर मंदिरात दर्शनादरम्यान सोन्याची अंगठी हरवली. त्यांनी तत्काळ राजगड पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून अंगठी शोधून ती मालकाला परत केली.
याशिवाय, चालू वर्षात पोलिसांनी ५६ हरवलेले मोबाईल फोन शोधून मालकांना परत केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे आणि पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, स.पो.फौ. चव्हाण, अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, अजय चांदा यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.





